राज्यमंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील करोना परिस्थिती, तौत चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान, पदोन्नती आरक्षण रद्दचा निर्णय आदींबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांन माध्यमांशी बोलताना, ‘तौते’ चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसंदर्भात झालेल्या निर्णयाची माहिती दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “या बैठकीत चक्रीवादळा संदर्भात देखील चर्चा झाली. एनडीआरएफ व एसडीआरएफचे जे निकष आहेत, त्यामध्ये जी मदत आहे त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून कॅबिनेटमध्ये सगळ्याच मंत्र्यांनी या चक्रीवादळात झालेलं जे नुकसान आहे, त्यामध्ये राज्य सरकारने जास्तीत जास्त भरीव मदत नागरिकांना दिली पाहिजे अशाप्रकारची भावना व्यक्त केल्यानंतर, एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषावर मदत न देता, मागील वेळी निसर्ग चक्रीवादळानंतर जशी मदत दिली, ती मदत या ठिकाणी देण्याचा निर्णय़ झालेला आहे.”

तसेच, लॉकडाउन संदर्भातील अंतिम निर्णय हा टास्क फोर्सशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जाहीर करतील अशी देखील माहिती त्यांनी दिली.
“राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत करोना परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागाने संपूर्ण राज्याची माहिती दिली. यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये प्रमाण कमी झालेलं दिसत असलं तरी देखील, काही ग्रामीण जिल्ह्यात प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी देखील समोर आलेली आहे. यामध्ये निश्चितपणे अद्यापही संपूर्ण राज्यात आकडेवारी कमी झाली असं म्हणता येणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन, ऑक्सिजन तुटवडा, म्युकरमायकोसिसचा धोका, लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण आदी सर्व बाबतीत चर्चा झाली. ऑक्सिज प्लॅन्ट वाढवण्यासंदर्भात देखील चर्चा झाली. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, याबाबतीत टास्क फोर्स बरोबर चर्चा करून लॉकडाउन संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील.लॉकडाउन वाढवण्याचा किंवा सूट देण्याबाबतचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.”