|| विकास महाडिक

राज्यात घाट माथ्यावरील प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील सर्वच उमेदवारांची मदार ही कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदार संघातील मतदारांवर असल्याचे दिसून येते. मावळ लोकसभा मतदार संघातील एकूण १९ लाख मतदारांपैकी दहा लाख ७६ हजार मतदार कोकण विधानसभा मतदार संघातील आहेत. या मतदारांना आपल्याकडे आर्कषित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून राष्ट्रवादीसाठी ही जागा अंत्यत प्रतिष्ठेची झाली आहे.

लोकसभा मतदार संघ पुर्नरचना आयोगाच्या शिफारशीनुसार फेब्रुवारी २००८ रोजी राज्यात मावळ हा एक नवीन मतदार संघ अस्तित्वात आला. खंडाळा घाटाच्या वरील मावळ, चिंचवड, आणि पिंपरी हे तीन विधानसभा मतदार संघ आणि कोकणातील कर्जत, पनवेल, आणि उरण या तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा हा वेडावाकडा लोकसभा मतदार संघ अनेकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. भाषा, प्रांत आणि संस्कृती बाबत भिन्न असलेले पश्चिम व कोकण हे दोन प्रदेश या मतदार संघामुळे एक आले आहेत. राज्यात अशा प्रकारची भौगोलिक रचना असलेला बहुधा हा एकच मतदार संघ आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या दोन लोकसभा निवडणुकीत उमेदवार घाटावरचा आणि सर्वाधिक मतदार कोकणातील असे चित्र आहे. दोन्ही निवडणुकीत या मतदार संघावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. मतदार पुर्नरचनेनंतर झालेल्या पाहिल्या निवडणूकीत गजानन बाबर आणि दुसऱ्या निवडणुकीत श्रीरंग बारणे हे दोन शिवसेनेचे खासदार या मतदार संघाने देशाला दिलेले आहेत. मागील  निवडणुकीत घाटावरील तीन विधानसभा मतदार संघात एकही मतदान मिळण्याची आशा नसलेले शेकापच्या लक्ष्मण जगताप यांनी बारणे यांना चांगलीच टक्कर देऊन तीन लाख ५४ हजार मतदान केवळ रायगड जिल्ह्य़ातील तीन मतदार संघात मिळविले होते.

यावेळी राष्ट्रवादीचा नवखा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेष्ठ चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू पार्थ पवार याला उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एक आले असल्याने मावळ मध्ये देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप महाआघाडी आहे. घाटावरच्या तीन विधानसभा मतदार संघापेक्षा कोकणातील तीन मतदार संघावर राष्ट्रवादीची खरी मदार आहे. शिवसेना भाजपा युतीत ही जागा ठरल्या प्रमाणे शिवसेनेच्या वाटय़ाला आली असून पवार विरुध्द बारणे ही लढत निश्चित मानली गेली आहे. या दोन्ही उमेदवारांची खरी मदार ही कर्जत, पनवेल, आणि उरण मतदार संघावर आहे. या तीन मतदार संघाचे सध्या विधानसभा प्रतिनिधीत्व अनुक्रमे राष्ट्रवादी (सुरेश लाड) भाजपा (प्रशांत ठाकूर) आणि शिवसेना (मनोहर भोईर) हे तीन पक्ष करीत आहेत. बारणे यांना गेल्या वेळच्या निवडणुकीत पाच लाख १२ हजार २२६ मते मिळाली होती. ही टक्केवारी ४३.६२ टक्के असून यातील ४० टक्के मतदान हे घाटाखालच्या तीन मतदार संघातील आहे.

रायगड आणि पुणे जिल्ह्य़ातील तीन तीन विधानसभा मतदार संघ मिळून तयार झालेल्या या मावळ प्रांत लोकसभा मतदार संघाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदार संघ पुर्नरचनेनंतर दोन्ही वेळा शिवसेनेने या ठिकाणी बाजी मारली आहे. कर्जत, पनवेल, उरण विधानसभा मतदार संघात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाल्याने नवीन मतदार आलेला आहे. मागील पाच वर्षांत हे प्रमाण वाढले आहे. उत्तम भविष्य असलेल्या या मतदार संघात स्थिती जैसे थे राहाते की त्यात बदल होते ते लवकरच कळणार आहे.