वसईतील एका वीज ग्राहकाला थोडेथोडके नव्हे तर चक्क ८० कोटी रुपयांचे वीज देयक महावितरणाने पाठवले आहे. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता वीज देयकाची दुरूस्ती केली जाईल, अशी सारवासारव करण्यात आली.

वसई विरारमधील ग्राहकांना अवाजवी वीज देयके येत आहेत. वसई पश्चिमेला  निर्मळ येथील नाईक कुटुंबाची भाताची गिरणी आहे. त्यांना दरमहा सरासरी ५० ते ६० हजार वीज देयक येते. सोमवारी संध्याकाळी नाईक कुटुंबाला महावितरणाचे वीज देयक आले. त्यावरील  ७९ कोटी १४ लाख ९६ हजार रुपये हा आकडा पाहून त्यांच्या घशाला कोरड पडली.  माझे पती गणपत नाईक यांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. घरात आधीच ताणतणाव असताना महावितरणाने त्यात आणखी भर घातल्याची खंत प्रतिभा नाईक यांनी व्यक्त केली.

चुकीचे वीज देयक पाठवले गेले आहे. दुरुस्ती करून योग्य ते वीज देयक ग्राहकाला दिले जाईल.

-विजय दुभाटे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कल्याण परिमंडळ