30 September 2020

News Flash

यंत्र अपघातात हात, बोटे निकामी झालेले कामगार वाऱ्यावर

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांची रुग्णालयांशी हातमिळवणी

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांची रुग्णालयांशी हातमिळवणी

हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर : तारापूर औद्य्ोगिक क्षेत्रातील कारखांन्यात अनेक अपघात घडत असताना याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात दिली जात नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. कारखानदार काही निवडक रुग्णालयांशी हातमिळवणी करून प्रकरणे परस्पर मार्गी लावत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका कारखान्यात कामगारांची बोटे कापली गेली असताना या प्रकाराची पोलिसात नोंद नसल्याचे दिसून आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात १२५० हून अधिक कारखाने सुरू आहेत. यात पोलाद, अभियांत्रिकी, रासायनिक, कापड निर्मिती उद्योगांमध्ये वारंवार अपघात घडत असतात. कारखान्यात अकुशल कामगारांना जबाबदारीचे काम दिल्यावर कामगारांच्या चुकीने वा  कधी कारखानदारांच्या हलगर्जीमुळे अपघात होतात. त्यात कामगारांचा हात चिरडला जाणे, हाताची बोटे कापली जाणे, हातच कापला जाणे तसेच इतर गंभीर इजा झाल्यानंतर कारखानदार जखमींवर तात्पुरते उपचार करून घरी जाण्यास सांगतात. अशा घटनांनंतर कामगारांना तुटपुंजी रक्कम देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक कारखान्यांचे बोईसर भागातील रुग्णालयांसोबत वार्षिक करार झाले आहेत. जखमी कामगारांना उपचारासाठी या रुग्णालयांत दाखल करण्यात येत असते. काही कारखानदार अपघातानंतरची कायदेशीर प्रक्रियेतून सुटण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाशी तडजोड करतात आणि त्याची माहिती पोलिसांना देत नाहीत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी तारापूर औद्योगिक क्षेत्रात उघडकीस आला आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ‘करमतारा इंजिनिअरिंग’ या पोलाद क्षेत्रातील उद्योग कारखान्यात काम करणाऱ्या अकबर जलाद सय्यद या १९ वर्षीय कंत्राटी कामगाराचा २० मे २०२० रोजी यंत्रात हात अडकून उजव्या हाताची पाच बोटे निकामी झाली होती. या दुर्घटनेत अकबरला केवळ पाच हजार रुपयांची भरपाई मिळाली होती. त्यानंतर अकबर त्याच्या विधवा आईसह न्यायासाठी बोईसरच्या कामगार उपायुक्त कार्यालयात खेटे घालत होता. वृत्तपत्रांत याविषयी छापून आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने अकबरला नऊ  लाखांची तातडीची मदत दिली होती. कंत्राटी कामगार अकुशल असतानाही त्याला यंत्रावरील महत्त्वाची जबाबदारी का देण्यात आली, याविरोधात काही सरकारी नियम लागू आहे का, याबाबत विचारणा केली असता कामगार उपायुक्त किशोर दहिफळे यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले.

दर्शन मदतीविना

औद्योगिक वसाहतीतील लविनो कपूर कॉटन्स कारखान्यात परवेश दर्शन या कंत्राटी कामगाराचा हात यंत्रात सापडून निकामी झाला आहे.  गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ही दुर्घटना घडली होती. बोईसर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. नऊ महिन्यापूर्वी घडलेल्या अपघातामुळे कामगाराच्या हाताच्या हालचाली होत नसून त्यासाठी आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून मदत दिली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 1:04 am

Web Title: entrepreneurs from tarapur industrial area join hands with hospitals zws 70
Next Stories
1 ८२ गावांना जलदिलासा
2 उरणमध्ये रुग्णांची परवड
3 करोना मृतांवर मोफत अंत्यविधी
Just Now!
X