शिवाजी विद्यापाठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा बुधवारपासून सुरू होत असल्या, तरी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा क्रमांकाचा गोंधळ मंगळवारअखेर होता. संगणक सुविधेशिवाय परीक्षा अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रे अखेपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला देता आली नाहीत. त्यामुळे सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑड नंबरवर घेण्याचा निर्णय विद्यापीठाला ऐनवेळी घ्यावा लागला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या प्रथम सत्रातील परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहेत. कला शाखेच्या प्रथम व तृतीय वर्षांच्या प्रथम सत्रासाठी आणि पदव्युत्तर वाणिज्य वार्षकि पॅटर्नच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या परीक्षा बुधवार दि. २९ ऑक्टोबरपासून संबंधित महाविद्यालयात होत आहेत. गतवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा विभागातील गोंधळाचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना बसला असतानाही यंदाही गोंधळाची परंपरा विद्यापीठाने कायम राखली आहे.
विद्यापीठाकडे ऑनलाईन परीक्षा अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र मिळाले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पॅटर्नप्रमाणे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत. वार्षकिमधून सत्र आणि ४०-१० पॅटर्ननुसार परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, त्यामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीपर्यंत विद्यापीठ आणि एमकेसीएलमार्फत परीक्षा अर्ज दाखल करून घेण्यात येत होते. मात्र यंदा विद्यापीठाने ही सर्व जबाबदारी एमकेसीएलवर सोपविली असल्याने परीक्षा अर्ज स्वीकृतीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
यापूर्वी विद्यापीठाकडे दाखल होणाऱ्या परीक्षार्थीना १० अंकी कायम नोंदणी क्रमांक प्राप्त होत होता. मात्र एमकेसीएलकडून १६ अंकी कायम नोंदणी क्रमांक मिळत असल्याने हे परीक्षा अर्ज ऑनलाईन स्वीकारले गेले नाहीत. अशा सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र अथवा बठक क्रमांक विद्यापीठाकडून मंगळवारअखेपर्यंत प्राप्त होऊ शकले नाहीत.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत एक परिपत्रक ऑनलाईन प्रसिध्द केले असून अशा विद्यार्थ्यांना ऑड नंबरवर परीक्षा देता येणार आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरल्याची आणि फी भरल्याची खात्री महाविद्यालयांनी करण्याची आहे. एखाद्या विद्यार्थ्यांला दुहेरी नंबर मिळाला अथवा काही उणीव निर्माण झाली तर त्याची जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर असणार नाही. या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन, प्रात्यक्षिक परीक्षा मूल्यांकन ऑड नंबरवर भरण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहणार आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र, आसनक्रमांक महाविद्यालयातच मिळणार असून तोपर्यंत विद्यार्थ्यांनी होणारा मनस्ताप सहन करावा अशी विद्यापीठाची धारणा आहे. याचबरोबर बहिस्थ विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाली तरी अद्याप पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. या पुस्तकांसाठी विद्यापीठाने प्रवेश अर्जासोबतच फी आकारणी केली असून ऐनवेळी अभ्यासाविना परीक्षा देण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करण्यात आली आहे.