रेल्वेसेवा सुरू झाली तरी केवळ अत्यावश्यक आणि काही सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेत नसलेल्या कर्मचाऱ्यांना बस आणि इतर खासगी वाहनांतून कामावर जावे लागत आहेत. यात मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत, तर कामावरून घरी परतताना वाहनांची अनियमितता असल्याने मोठी दमछाक होत आहे.

जून महिन्यात सुरू झालेल्या रेल्वेत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर मुंबईतील सर्वच खासगी आस्थापना सुरू झाल्या. यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर जाणे बंधकारक करण्यात आल्याने मुंबईत कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त भरुदड सहन करत हालबेहाल करत कामावर जावे आणि घरी यावे लागत आहे.

अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या प्रवाशांचा सगळा भार बेस्ट, एसटी, खासगी बसेस, बसेस, टॅक्सी आदी सेवांवर पडत आहे. रोजचे खासगी सेवेचे प्रवासाचे भाडे परवडत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी एसटी, बेस्ट सेवेवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहेत. मात्र या बसेस अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या थांब्यावर बसमध्ये प्रवासी भरल्यावर, बसमध्ये जास्त गर्दी नको म्हणून अनेक बस पुढील थांब्यावर न थांबता थेट पुढच्या मार्गाला लागताना दिसतात. यामुळे प्रवासी तासन्तास रांगेत उभे राहतात.

मुंबईतही परिस्थिती भयानक आहे. परतीचा प्रवास करताना बस आणि कामाचे ताळमेळ बसत नसल्याने भटकंती करावी लागते. त्यातही बसेस आधीच भरलेल्या असल्याने गर्दीत उभे राहून प्रवास करावा लागतो. तर काहींना २ ते ३ बसेस बदलून घरी यावे लागते. यामुळे परतीच्या प्रवासात प्रचंड हाल होत आहेत.

त्रस्त नागरिकांचे शासनाला साकडे

विरारमधील रहिवासी रूपेश गमरे यांनी माहिती दिली की, ते सायनमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना नियमित कामावर जावे लागते. यासाठी त्यांना दररोज सहा तास प्रवास करावा लागतो. गर्दीतून आणि अनेक वेळा उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे शारीरिक त्रास अधिक होत आहे. तसेच पगाराचा मोठा भाग केवळ प्रवासावरच खर्च होत आहे. याचप्रमाणे मानसी तांडेल यांनी सांगितले की, महिलांचे तर त्याहून अधिक हाल होत आहेत. सर्वाधिक काळ घराच्या बाहेर राहिल्याने घरावर लक्ष देणे कठीण झाले आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर रेल्वेत खासगी कर्मचाऱ्यांनासुद्धा परवानगी द्यावी.