महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारीला राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. म्हणजेच १ मार्चला लॉकडाउन लावायचा की नाही यासंबंधी उद्धव ठाकरे निर्णय़ जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर लॉकडाउनची अफवा सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर सध्या एक स्क्रिनशॉट व्हायरल झाला आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या लोगोसहित असलेला उद्धव ठाकरेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. अनेकजण एकमेकांना फोन, मेसेज करुन यासंबंधी विचारणाही करत आहेत. मात्र हे वृत्त पूर्णपणे खोटं असून उद्धव ठाकरेंनी असा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

हा बनावट फोटो फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर अशा अनेक ठिकाणी व्हायरल झाला आहे. राज्यातील रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत हे खरं आहे. मात्र लॉकडाउनसंबंधीची कोणताही निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे तुमच्याकडे हा फोटो आला असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नकाच, पण तो पुढे कोणाला फॉरवर्डदेखील करु नका.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते-
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. “रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ८ हजारापेक्षा जास्त करोनाबाधित
गुरुवारी राज्यात ८७०२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. बुधवारी ८८०७ करोनाबाधितांची नोंद झाली होती. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४४ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४९ टक्के एवढे आहे. राज्यात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,५२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check maharashtra cm uddhav thackeray lockdown sgy
First published on: 26-02-2021 at 08:30 IST