राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालयाबाहेर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने पोलिसांनी कार्यालयाची तपासणी केली. ज्यानंतर ही एक अफवा असल्याची माहिती समोर आली. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास जळगाव पोलीस नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका वाहनात बॉम्ब असल्याची माहिती या फोनवरून अज्ञाताने दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा फोन अवघ्या काही मिनिटांनी गेला.

ही बातमी समजताज एकच खळबळ उडाली, बॉम्ब शोधक पथक आणून गिरीश महाजन यांचे कार्यालय आणि परिसर यांची कसून तपाससणी करण्यात आली. मात्र कोणतीही बॉम्बसदृश गोष्ट या ठिकाणी आढळली नाही. दरम्यान पोलिसांना ज्या क्रमांकांवरून फोन आले त्यांची माहिती पोलीस घेत आहेत. ही अफवा ज्याने पसरवली त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन ही अफवा होती. अफवा पसरवून पोलीस यंत्रणेस वेठीस धरणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी गिरीश महाजन यांच्या कार्यालयात काम करणारे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी केली आहे.