उद्या होत असलेल्या भारत बंदमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर जनतेनं बंद पाळण्याचंही आवाहन केलं आहे. शिवसेनेनं जाहीर केलेल्या भूमिकेवरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी जुन्या भूमिकेची आठवण करून देत शिवसेनेवर टीकेचा बाण डागला आहे. “आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा!,” असा उपहासात्मक टोलाही शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.

भारत बंदला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला. शेलार म्हणाले,”दिल्लीत लोकसभेत शिवसेनेचा सीएए आणि कृषी विधेयकाला पाठिंबा आणि राज्यसभेत विरोध… महाराष्ट्रात प्रथम समृद्धी महामार्गाला विरोध आता श्रेयासाठी पाहणी दौरे सुरु… मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो बाबतही अशाच आप-मतलबी भूमिका… दिल्ली ते गल्ली “दल बदलू” कार्यक्रम सुरुच!,” अशी टीका शेलार यांनी केली.

“हिंदुत्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी… आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा!,” असा सल्लाही शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

“नुकतीच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली करोना काळात आंदोलने आवरा! आता भारत बंदमध्ये जनतेने सहभागी व्हावे,असे तुम्हीच सांगताय? अन्नदात्याला सगळ्यांचीच सदैव सहानुभूती आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या नावाने दल-बदलू राजकारण करणाऱ्यांनाच खरी “कर्माची फळे” भोगावी लागतील!,” असा सूचक इशारा शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

“काही पक्षांना स्मृतीभ्रंश झालाय”

“या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचं ४८ वर्ष दोन महिने सरकार होतं. देशात ५२ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचं सरकार होतं. ज्याला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणायचो, मग त्या कृषी क्षेत्रात असं काय झालं? का व्याख्या बदलली याचं कधी चिंतन केलं का? आज काही राजकीय पक्ष मी नेत्यांबद्दल बोलत नाही. त्यांना राजकीय विस्मरणाचा आजार झाला. त्याला आपण पॉलिटिकल अल्झायमर हा शब्द वापरू शकतो,” असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.