शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून देशातील वातावरण तापलं असून, राज्याच्या राजकीय वर्तुळातही आरोपांच्या कुरघोड्या सुरूच आहेत. कृषी विधेयकावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्याचबरोबर भारत बंददरम्यान, कायद्यांची होळी करत विरोध दर्शवला होता. शेट्टी यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर कायद्यांबद्दल राजू शेट्टी यांच्यासोबत कधीही चर्चा करण्यास तयार आहे,” असं थेट आव्हान पाटील यांनी शेट्टी यांना दिलं.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि महाविकासआघाडी तील हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी सुरू आहे. काल मुश्रीफ व सतेज पाटील यांनी चंद्रकांत दादांना लक्ष्य केले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन नेत्यांचा मंगळवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “केंद्र शासनाच्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. पण यातून दलाली घटन्याची भीती वाटणाऱ्या मध्यस्थांना भीती वाटत आहे. त्यातून हे आंदोलन तापवले जात आहे,” असा आरोप पाटील यांनी केला. आज आंदोलनावेळी राजू शेट्टी यांनी कृषि विधेयकावर चंद्रकांत पाटील यांच्याशी कोल्हापुरात जाहीरपणे चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यावर आमदार पाटील यांनी पत्रकार संघटनेने सारख्या चांगल्या संस्थांनी पुढाकार घेतला तर चर्चेची तयारी आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले

भाजपाला राजकीय फायदाच

“देशातील सर्वसामान्य शेतकर्‍यांचा या विधेयकाला पाठिंबा आहे. पंजाब, हरियाणा वगळता इतर ठिकाणी विरोध होत नाही. तसे असते अन्य राज्यातही आंदोलनाचे चित्र दिसले असते. या आंदोलनाचा निवडणुकीवर कसलाही परिणाम होणार नाही. उलट शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तोडल्याबद्दल शेतकरी नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “बाजार समित्यांचे अस्तित्व पुसले जाणार नाही. मी सहकार मंत्री असताना राज्यातील बाजार समित्यांची मक्तेदारी दूर करणारे निर्णय घेतले होते. तेव्हा पंधरा दिवस बंद पाळण्यात आला होता. मात्र शेतकरी त्यांचा माल आता कुठेही विकू शकतो. करोना काळामध्ये कोकणातील शेतकऱ्यांनी त्यांचा आंबा ऑनलाईन विकला, हे त्याचे उदाहरण आहे. हितसंबंधी लोकच या आंदोलनात आहेत. आपल्या मालाचे नुकसान होऊ नये, दुकानाची नासधूस होऊ नये यासाठी आज बंदला पाठिंबा दिल्याचे दिसते,” असेही ते म्हणाले.