समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्य़ातील कानाकोपऱ्यात पुन्हा आपल्या सोशलिस्ट पार्टीच्या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांना एका झेंडय़ाखाली आणण्याचा चंग बांधला आहे. पुन्हा एकत्रित येऊन १९५७ पासून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकप्रिय नेते आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार बॅ. नाथ पै आणि प्रा. मधु दंडवते यांनी भारतात प्रथम क्रमांकावर नेलेल्या या भूमीला पुन्हा स्वाभिमानाने तोच क्रमांक प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
नुकताच सोशलिस्ट पार्टी (इंडिया) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पाटणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा झंझावाती दौरा केला. फोंडा, कणकवली, पणदूर, कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडीपर्यंतच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत फोंडय़ाचे माजी जि. प. सदस्य कॉ. बापू नेरुरकर, वीज कामगार नेते कॉ. प्रदीप नेरुरकर, कुडाळचे अशोक किनलेकर, वेंगुल्र्याचे पंढरीनाथ महाले, शशी कर्पे, वरिष्ठ नेते, ‘वैनतेय’चे संपादक, सावंतवाडीचे माजी आ. जयानंद मठकर, सोशलिस्ट पार्टी उपाध्यक्षा कमल परुळेकर हे प्रभावी सोशलिस्ट नेते होते. या सर्वानी सोशलिस्ट पार्टीच्या पुनर्बाधणीसंबंधी एकमताने निर्णय घेऊन पुन्हा जिल्ह्य़ातील सर्व कार्यकर्त्यांचा एक मेळावा ऑक्टोबरदरम्यान घेण्याचा निर्णय घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वर्तमान राजकीय परिस्थितीने आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचाराने व राजकीय वरदहस्त लाभलेल्या बेकायदेशीर खनिज धंद्याने बॅ. नाथ पै, मधु दंडवते, सी. स. सावंत आदी अगदी जुन्या प्रामाणिक काँग्रेस नेतृत्वानेसुद्धा प्रतिष्ठित केलेल्या या जिल्ह्य़ाची जी बदनामी केली आहे ती दूर करून सामान्य माणसाचा स्वाभिमान पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यात अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सोशलिस्ट पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच येत्या निवडणुकीत सोशलिस्ट पार्टीच्या उमेदवाराने निवडणूक लढविण्याचा विचार काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
वरिष्ठ नेते माजी आ. जयानंद मठकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सोशलिस्ट पार्टीच्या कार्यालयाची आर्थिक तसेच सर्व प्रकारची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले असून त्यांनी सोशलिस्ट पार्टीचा एक कामगार मेळावाही घेण्याचे जाहीर केले. कॉ. प्रदीप नेरुरकर यांनी गटसभा घेण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले असून त्या सभांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली.
सावंतवाडी ते खारेपाटणपर्यंतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आणि राजापूर ते चिपळूणपर्यंतच्या रत्नागिरी जिल्ह्य़ात सोशलिस्ट पार्टीचे मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. या वर्तमान लोकसभा मतदारसंघाची मशागत करण्याचा सोशलिस्ट पार्टीने चंग बांधला असून त्यांना सुरुवातीला केवळ या सोशलिस्ट निखाऱ्यावरची राख फुंकली की त्यातून ज्वाला पेटतील, असा विश्वास पाटणकर यांनी व्यक्त केला.