शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रदेशात दुबार पेरणीची स्थिती; नामांकित कंपन्यांचे बियाणे उगवलेच नाही

अमरावती : शेतकरी आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या पश्चिम विदर्भात कृषी विभागाकडून प्रमाणित करण्यात आलेले नामांकित कंपन्यांचे बियाणे न उगवल्याने शेतकरी मोठय़ा संकटात सापडला आहे. सुमारे साडेसहा हजार एकर क्षेत्रात बियाणे न उगवल्याच्या तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या असून या सर्व क्षेत्रांत दुबार पेरणीचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

जमिनीत पुरेशी ओल असतानादेखील ‘महाबीज’सह विविध कंपन्यांचे बियाणे उगवले नाही, अशा तक्रारी सातत्याने वाढत आहेत. मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमधून महागडे सोयाबीन, कपाशीची बियाणे खरेदी करून पेरणी केली. पण या सदोष बियाणांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. यापूर्वीच्या हंगामामध्येही बनावट, सदोष बियाणांच्या तक्रारी प्राप्त होत होत्याच, पण यंदा हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

अमरावती जिल्ह्य़ातून ५९५, अकोला ४७९, यवतमाळ ५४९, बुलडाणा १३४ आणि वाशीम जिल्ह्य़ातील ३३१ अशा एकूण २०८८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्य़ात तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. न उगवलेल्या बियाण्यांमध्ये महाबीजसह अन्य २५ ते ३० कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणी होण्यापूर्वीच पावसात भिजले होते. ओले झालेले सोयाबीन पेरणीसाठी वापरता येऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीपेक्षा महागडय़ा दराने बियाणे विकत घेतले होते.

सदोष बियाणांच्या प्रकरणांमध्ये तालुकास्तरीय समिती स्थापन झालेल्या असून या सहासदस्यीय समितीच्या सदस्यांकडून प्रत्यक्ष शेताची पाहणी केली जात आहे. त्यांचे निष्कर्ष आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून येणाऱ्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला त्या ठिकाणी तक्रारींचे प्रमाण कमी आहे. – सुभाष नागरे, कृषी सहसंचालक, अमरावती.

सदोष बियाणांमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कृषी विभागाने कडक कारवाई करावी, असे निर्देश मी दिले आहेत. शेतकऱ्यांनी खचून न जाता काही अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

 बच्चू कडू, जलसंपदा, कामगार  व शिक्षण राज्य मंत्री.