शासकीय प्रक्रियेत शेतक ऱ्यांची फरपट

परतीच्या पावसाने जगले-वाचलेले सोयाबीन हमी केंद्रावर खरेदीसाठी विविध निकषांत अडकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सातबारा उताऱ्यावर सोयाबीनची नोंद असेल तरच खरेदी केंद्रावर नोंदणी होऊ शकेल असा फतवा काढण्यात आल्याने चावडीत बसून पीकपाणी नोंदविणाऱ्या अण्णासाहेबांना शोधणे आणि आंतरपीक असेल तर खासगी व्यापाऱ्याची मनधरणी करावी लागत आहे.

यंदा मूग, उडीद, सोयाबीन यांच्यासाठी शासनाने आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. पावसाने प्रारंभीच्या काळात दगा दिल्याने कडधान्य उत्पादन कमी झाले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्याकडे सिंचन सुविधा होती अशांचे सोयाबीन साधले. मात्र, काढणीच्या वेळी परतीच्या मान्सूनने मुक्काम ठोकल्याने तयार सोयाबीन भिजले आहे. यामुळे उत्पादित मालामध्ये आद्र्रतेचे प्रमाण जास्त आहे.

सोयाबीनसाठी क्विंटलला ३ हजार ५० रुपये दर आधारभूत निश्चित करण्यात आला आहे. या दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्याला बाजार समितीच्या हमी भाव खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागत आहे. ही नोंदणी करीत असताना सात-बारा उतारा आणि या उताऱ्यावर सोयाबीन पिकाची नोंद असणे गरजेचे आहे. याचबरोबर आधारकार्ड आणि बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत देणे आवश्यक आहे. रानात सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात मोठय़ा प्रमाणात होते. मात्र, सातबारा उताऱ्यावर खरीप आणि रब्बी असा स्वतंत्र कॉलमच नाही. पिकाची नोंदणी या वर्षीच्या खरीप हंगामातील असणे आवश्यक आहे. बहुसंख्य ठिकाणी गावच्या तलाठय़ांनी म्हणजेच अण्णासाहेबांनी पीक-पाहणी नोंदणी चावडीतच बसून केलेली असते. आता खरेदी केंद्रावर गेल्यानंतर पीक नेंदणीचा उतारा आवश्यक ठरल्याने शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे.

काही शेतकरी आडसाली उसात सोयाबीन हे आंतरपीक घेतात. मात्र, आंतरपिकाची नोंद केली जात नाही. सोसायटी कर्जासाठी उसाची तेवढी नोंद केली जाते. सातबारा उताऱ्यावर केवळ ऊसच दिसत असून सोयाबीनचा पत्ताच नाही. मग ऑनलाईन खरेदी केंद्रावर नोंदणी कशी करायची, असा शेतकरी वर्गापुढे प्रश्न पडला आहे.

सोयाबीनची लागवड करण्यासाठी एकरी अडीच हजार रुपयांचे बियाणे वापरले. पेरणीसाठी एक हजार रुपये बलजोडीला आणि लावणीला खर्च केले. पावसाच्या दीर्घ विश्रांतीने उताराही एकरी तीन पोते असा आहे. उत्पादित सोयाबीन मळणीचा दरच पोत्याला ३०० रुपये आहे. यात एवढा खर्च करूनही काढणी, भांगलन याचा हिशोब लागत नसल्याने यंदा सोयाबीन उत्पादक अडचणीत आले आहेत.