राजू शेट्टी यांचा इशारा

शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न विनाविलंब सोडवा, अन्यथा जनता मंत्र्यांना ठोकून काढेल, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा महामोर्चा मुंबईत पोहोचला आहे. या महामोर्चाचे शिस्तबद्ध असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मोर्चा आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याच्या शासनाच्या भूमिकेबाबत शेट्टी म्हणाले, जेव्हा मुख्यमंत्री गोड  बोलतात, तेव्हाच गोडपणाविषयी भीती वाटायला लागते. शासनाने शेतकऱ्यांचे समाधान होईल अशी पावले टाकली असती तर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. शेतकऱ्यांनी आंदोलने किती करायची यालाही मर्यादा आहेत. त्याची अंतशक्ती पाहू नका.  शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न विनाविलंब सोडवा, अन्यथा लोक मंत्र्यांना ठोकून काढतील.

आताचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी शेतीमालाला दीडपट हमीभाव देणार असल्याचे म्हणत होते. सत्तेत आल्यानंतर लगेचच त्यांनी याची अंमलबजावणी केली असती तर शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली नसती. त्याचा सातबारा कोरा करा ही साधी मागणी असून त्याची पूर्तता केली पाहिजे.

शेतकरी चळवळीची पुढील दिशा काय राहील याविषयी शेट्टी म्हणाले, देशातील १९३ शेतकरी संघटनांनी किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून देशव्यापी लढा सुरू केला आहे. त्यामध्ये माकपच्या किसान सभेचा समावेश आहेच. आम्ही सर्व जण एकदिलाने संघर्ष करीत आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर शेतकरी संघटना शासनाला शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकायला भाग पाडतील.

पूनम महाजनांवर टीका

शेतकऱ्यांचा महामोर्चात माओवाद डोकावत असल्याचे विधान भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा, खासदार पूनम महाजन यांनी केले आहे. त्यावर शेट्टी म्हणाले, सनदशीर मार्गाने लढा देऊनही शासन जागे होणार नसेल तर शेतकऱ्यांनी आक्रमक का होऊ नये, असा प्रतिप्रश्न करत त्यांनी महाजन यांच्यावर टीका केली.