बेलापूर येथील अनधिकृत गाळ्यांचे फेरवाटप करण्यात यावे, बेकायदेशीर बांधकाम करणारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सेवानिवृत्त जवान सुभाष नगरकर यांनी सुरु केलेले उपोषण आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
बेलापूर ग्रामपंचायतीने बांधलेल्या अनधिकृत गाळ्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नगरकर यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. उपोषणकर्त्यांस भेट देण्यासाठी पतित पावन संघटनेचे जिल्हा संघटक सुनील मुथा आले असता त्यांनी उपोषणकत्यार्ंशी चर्चा करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयात सुनील मुथासह उपसरपंच रफीक शेख, जनता आघाडीचे अध्यक्ष रिवद्र खटोड, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अभिषेक खंडागळे, विलास मेहेत्रे, अरुण नाईक, ग्रामविकास अधिकारी दौलत नवले यांनी उपोषण सोडविण्याकरीता काय करता येईल यावर चर्चा केली. त्यावेळी मुथा यांनी बेकायदेशीर गाळ्यांना सील लावून फेरवाटप करण्यात यावी अशी सूचना केली.
हा विषय सुरु असतानाच शरद नवले यांनी सत्ताधारी करत असलेल्या चुकीच्या कामाचा पाढा ग्रामपंचायतीसमोर वाचला. सर्व चुकीच्या कामाचे पुरावे असल्याचे सांगितले. यावेळी अनधिकृत गाळ्यांच्या विषयाबरोबरच दारुबंदीचा ठराव असताना दिलेला नाहकरतीचा विषय निघला. त्यावेळी चांगलीच गरमागरम चर्चा झाली. खटोड यांनी ग्रामसेवक गावात येतच नाही अशी तक्रार केली. ग्रामविकास अधिकारी नवले यांनी मी या ठिकाणी हजर झाल्यापासून माझ्यावर खोटे नाटे आरोप केले जात आहे. मी गावात येत नसेल तर बीडीओ माझ्यावर कारवाई करतील, माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करु नका, असे सांगितले. वाबळे, खटोड व नवले यांच्यात वादावादी झाली जो तो आपआपल्या परीने आपल्या सोईने घेत असल्यामुळे मुथा चिडले व त्यांनी ग्रामपंचायततीला कुलूप लावण्याचे जाहीर करताच संतप्त ग्रामस्थांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ग्रामपंचायतीस टाळे ठोकले.
त्यानंतर उपोषणकर्त्यांचा विषय प्रथम सोडवा इतर वादाचे विषय बाजूला ठेवून अधिकारी पुन्हा एकत्र बसले, मात्र सत्ताधारी सदस्यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकास अधिकारी नवले यांनी सर्व अनधिकृत गाळे सील करण्यात येतील, १५ जूनपर्यंत चौकशी करुन अहवाल सादर करण्यात येईल. चौकशीत जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करून गाळे अधिकृत असतील तर शासकीय नियमाप्रमाणे वाटप केले जाईल असे सांगितले. त्यामुळे नगरकर यांनी आपले उपोषण मागे घेतले.