प्रशांत देशमुख

पावसाळा उंबरठय़ावर आला असूनही खरेदीतील संथ गतीमुळे चणा उत्पादक शेतकरी घायकुतीस आले आहेत. लाखो क्विंटल चणा घरीच पडून राहण्याची  भीती व्यक्त होत आहे. यावर्षी चण्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने दोन पैसे अधिकचे मिळण्याचा आनंद करोनाने हिरावून घेतला आहे.

करोनामुळे खरेदीवर मर्यादा आली असून सुरक्षेच्या नियमामुळे प्रत्येक जिल्हय़ात चणा खरेदीचे निकष बदलत आहेत. पारंपरिक पद्धतीने सरसकट खरेदी होत नसल्याने पावसाळय़ापूर्वी सर्वच माल विकला जाण्याची शक्यता धुसर आहे.

करोनापूर्व काळात हमीभावापेक्षा कमी किंमतीत विदेशातून आयात झाल्याने चणा खरेदी मंदावली होती. भारतात हमीभाव ४ हजार ८०० रुपये क्विंटल असताना विदेशातून ३ हजार ९५० रुपये क्विंटल या भावाने आयात होत असल्याचे पाहून शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी आयात थांबवण्याची विनंती केंद्र व राज्य शासनाकडे केली होती.

राज्य व केंद्र खरेदीबाबत परस्परावर जबाबदारी ढकलत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते. नाफेडच्यावतीने सध्या विविध जिल्हय़ात खरेदी होत आहे. वर्धा जिल्हय़ात प्रती हेक्टरी पावणेदहा क्विंटल तर अन्य जिल्हय़ात १६ क्विंटल प्रतिहेक्टर खरेदी सुरू आहे.

खरेदी सुरू होऊन पंधरा दिवस झाले. नोंदणीकृत अकराशे शेतकऱ्यांपैकी केवळ १७५ शेतकऱ्यांचाच चणा खरेदी झाला आहे.

करोना प्रादुर्भावामुळे मुळात नाफेडचे केंद्रच उशिरा सुरु झाले. आता करोनाचे सुरक्षाविषयक नियम कठोरतेने अंमलात येत असल्याने दैनंदिन खरेदी अपेक्षेएवढी होत नसल्याची स्थिती आहे.

हेक्टरी २५ क्विंटलचे उत्पादन यावर्षी झाले असताना केवळ पावणेदहा क्विंटलची खेरेदी मार्यादा असल्याने सर्वच शेतकऱ्यांचा चणा मुदतीत खरेदी करणे शक्य होणार नसल्याचे बाजार समितीत ऐकायला मिळाले. जिल्हानिहाय हेक्टरी उत्पादन क्षमता वेगवेगळी आहे.  राज्यात सर्वाधिक नांदेडला १७०८ हेक्टरी उत्पादन क्षमता असल्याची नोंद आहे.

खरेदीची गती वाढवा

मात्र यावर्षी चांगल्या पावसामूळे सरासरी २० ते २५ क्विंटल हेक्टरी चणा उत्पादन झाल्याची आकडेवारी भूमिपुत्र संघर्ष वाहिनी या संघटनेने निदर्शनास आणली. संघटना पदाधिकाऱ्यांनी विदर्भातील काही जिल्हय़ाचा आढावाच घेतला. खरेदीची गती वाढवण्यासोबतच प्रतिहेक्टरी मर्यादा वाढवणेसुद्धा आवश्यक असल्याचे मत संघटनानेते अभिजीत फाळके यांनी व्यक्त केले. पावसाळय़ात चणा घरीच पडून राहल्यास त्याला डंख लागतो. हा खराब झालेला माल कवडीमोल ठरतो. तसेच पावसाळय़ात दालमिल बंद असतात. त्यामुळे व्यापारीसुद्धा खरेदी टाळतात. सरकारी खरेदी संथ असल्याने गरजू शेतकरी हमीभावापेक्षा कमी भावात म्हणजे ३६०० ते ३८०० रुाये क्विंटलने चणा विकत आहे. प्रतिक्विंटल हजार रुपये कमी भावाने चणा विकल्या जात असल्याने आम्ही शासनाकडे या संदर्भात लक्ष वेधले आहे. अनेक जिल्हय़ात निवेदने देऊन प्रतिहेक्टरी खरेदी वाढवण्याची मागणी केली असल्याचे फाळके म्हणाले.

शेतकऱ्यांकडील संपूर्ण चणा खरेदी करण्याचे प्रयत्न आहेत. प्रामुख्याने चंद्रपूर, वर्धा व नागपूर जिल्हय़ांत खरेदी सुरू असून दीड ते पावणेदोन लाख क्विंटल चणा खरेदी होण्याची शक्यता आहे. सर्व खरेदी होण्यासाठी शासनाकडे प्रसंगी मुदतवाढ मागितली जाईल. गरजेनुसार तसा प्रस्ताव सादर करू.

– अतुल नेरकर, नाफेडचे नागपूर विभागीय व्यवस्थापक