पैठण शहरातील खाटीक वाड्यात मटणाचे दुकान लावण्याच्या कारणावरुन कुरेशी खाटीक समाजाच्या दोन गटात जोरदार हणामारी झाली. या हणामारीत चक्क कोयते आणि लोखंडी गजांचा वापर करण्यात आला. अर्धा तास दोन्ही गटात जोरदार दगडफेक सुरू होती. अचानक झालेल्या या हणामारी आणि गोंधळामुळे परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले आहे.

आज (२१ फेब्रुवारी रोजी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. सर्व जखमींवर पैठणच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन्ही गटाकडून महीलांनाही मारहाण करण्यात आली. मंगळवारी रात्री या दोन गटात वाद झाला होता. दोन गटातील एका गटाने बीड आणि परभणी जिल्ह्यातील नातेवाईकांना बोलावून घेतले आणि दुसऱ्या दिवशी हाणामारी केली असे दुसऱ्या गटाने सांगितले. भर वस्तीत ही हाणामारीची घटना घडल्यामुळे परीसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वाद घालणारे दोन्ही गट हे कुरेशी (खाटीक) समाजाचे आहेत. या समाजात मटणाचे दुकान लावण्यावरुन नेहमी वाद होत असतात असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. काल मंगळवारी झालेल्या किरकोळ वादाचे आज मोठ्या हणामारीत रुपांतर झाले. दोनही गटाचे चाळीस पन्नास महिला आणि पुरुषांमध्ये सुरुवातीला बाचाबाची आणि त्यानंतर लोखंडी सळ्या आणि कोयत्याने हाणामारी झाली. मात्र इतक्यावर वाद न थांबता पुढे दोन्ही गटात जोरदार दगडफेक झाली. पोलिसांनी जमावाला शांत केले असून पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.