25 January 2021

News Flash

उमेदवारीवरून भाजपमध्ये चढाओढ

पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पडणे हीच भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आणि कर्तव्य असते

संग्रहीत छायाचित्र

दिगंबर शिंदे

भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करीत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे वरकरणी तरी दिसते. मात्र धोरणात्मक निर्णय घेत असताना आयारामांना फारसे महत्त्व असणार नाही याचीही दक्षता घेतली आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघातील आपले वारस ठरविण्यासाठी पक्षांतर्गत चर्चा होत असताना निष्ठावंतांना यामध्ये स्थान असणार की मागील निवडणुकीवेळी ज्यांना उमेदवारीचा शब्द दिला तो शब्द पाळला जाणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपची प्रदेश नवीन कार्यकारिणी अलीकडेच जाहीर करण्यात आली. यात पश्चिम महाराष्ट्राला अधिक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मोडून भाजपचा पर्याय उभा करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न आहे. प्रदेश कार्यकारिणी जाहीर करीत असताना आयाराम नेते पक्षाशी बांधील राहतील याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न पाटील यांनी कार्यकारिणी निवडत असताना घेतला असल्याचे दिसते. जुन्याजाणत्या आणि निष्ठावंत गटाला काहीसे मागील पंगतीत बसवून आयारामांना पुढच्या रांगेत बसविण्याचे आणि त्यांना स्वाभिमानाने पक्षात स्थान दिल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष या नात्याने दादांनी केला असला तरी कोणीही निर्णय प्रक्रियेत असणार नाही याचीही दक्षता घेतली असल्याचे जाणवते.

ताकद वाढविण्याचा प्रयत्न

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हय़ाचे राजकीय स्थान महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या साखर पट्टय़ामध्ये भाजपला मर्यादित यशच मिळत आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, माढा, पुणे या मतदारसंघांतील लोकसभेतील प्रतिनिधित्व भाजपकडे आहे. पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या विधानसभेच्या ५६ जागांपैकी १६ जागा तर भाजपकडे आहेत. कोल्हापूरमध्ये पक्षाची एकही जागा नसली तरी जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे हे सहयोगी सदस्य आहेत. साताऱ्यामध्येही दोन सदस्य आहेत. याशिवाय विधान परिषदेसाठी सांगलीतून एक तर सोलापुरातून दोन सदस्य पक्षाने दिले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाचा पाया विस्तारत असताना अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांना महत्त्वाची पदे देत असताना पक्षाने फारशी  खळखळ केली नसली तरी पक्षात आयुष्य घालवून पक्ष विस्तार करणाऱ्यांना मात्र बसायला खुर्ची न देता कट्टा दिला ही खदखद  कायम आहे. आता ही खदखद कमी करण्याचा प्रयत्न पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी आणखी वाढण्याची चिन्हे पडद्याआडच्या हालचालीवरून दिसत आहेत. यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काही काळ प्रकाश जावडेकर यांनी केले होते, तर मागील वेळी खुद्द चंद्रकांतदादांनी केले होते.

या निवडणुकीसाठी अनेक मातबर तयारीत आहेत. यामध्ये पुण्याचे राजेश पांडे आणि मिरजेचे मकरंद देशपांडे यांची नावे अग्रक्रमावर असली तरी शेखर चरेगावकर, सचिन पटवर्धन, शौनक महाडिक, अंकिता पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदींची नावे चर्चेत आहेत. यापैकी देशपांडे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रदेश कार्यकारिणीमध्ये यापूर्वी सांगलीचे शेखर इनामदार, नीता केळकर यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद होते, तर देशपांडे यांच्याकडे सचिवपद होते. तर इचलकरंजीचे सुरेश हळवणकर यांच्याकडे सरचिटणीसपद होते. कार्यकारिणीमध्ये या सर्वाना बाजूला ठेवण्यात आले असून सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. इनामदार यांच्याकडे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका आणि नगरपालिकेतील भाजप सदस्यांमध्ये समन्वय साधून पक्ष विस्ताराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पडणे हीच भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आणि कर्तव्य असते. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मिळेल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो. नव्या कार्यकारिणीबाबत नाराजी असण्याचा प्रश्नच नाही.   – पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:17 am

Web Title: fighting in bjp over candidature abn 97
Next Stories
1 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती
2 कुटुंबावर बहिष्कार टाकणाऱ्या बंजारा जात पंचायतीविरूद्ध गुन्हा
3 रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला सहा हजारांचा टप्पा 
Just Now!
X