पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले लाईट बंद करुन दिवे किंवा मेणबत्ती लावा असं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र टाळेबंदी असताना काही ठिकाणी फटाके वाजवण्यात आले. चंद्रपुरातल्या काही भागातही फटाके लावण्यात आले. त्यामुळे चंद्रपुरातल्या जिवती तालुक्यात असलेली दोन घरं आगीत जळून राख झाली. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघा देश एकत्र आला आहे हा उद्देश मनात ठेवून एक दिवा आपल्या दारात किंवा गॅलरीत पेटवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. मात्र फटाके वाजवण्यात आल्याने जिवती या ठिकाणी दोन घरांचं अतोनात नुकसान झालं.

बल्लारपूरचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व पत्नी सपना मुनगंटीवार यांनी दिवे लावून सकारात्मकतेचा संदेश दिला. तसेच शहरातील बहुतांश प्रभागातील लोकांनीही दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावून संकट काळात देशासोबत असल्याचे दाखवून दिले. परंतु काही अतिउत्साही नागरिकांनी या नऊ मिनिटांच्या कालावधीत टाळेबंदीतही सर्व नियम धाब्यावर बसवून अक्षरश: दिवाळीसारखे फटाके वाजवले. यामुळे दिवे लावा या कार्यक्रमाला काहीसे गालबोट लागले. असंख्य लोकांनी रस्त्यावर मशाली घेऊन येत गो करोना गो च्या घोषणाही दिल्या.

रविवारी दिवे लावण्याचा कार्यक्रम सुरू असतांनाच जिवती तालुक्यातील पाटण येथील कुंदन देवराव उईके या गरीब आदिवासीचे घर जळाले. उईके यांनीही या कार्यक्रमात सहभाग दर्शविला होता. मात्र यात त्यांचे घर जळून राख झाले. कुटुबांतील व्यक्तीने आरडा ओरडा केले असता गावातील लोकांनी येवून पाणी टाकून आगीला आटोक्यात आणले, त्या धान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच महात्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. त्यात रोख १५ हजार रूपये, एक ते दिड क्विंटल तुरीची डाळ, स्वस्त धान्य दुकानातून आणलेले ५० किलो धान्य, ज्वारी, वडिलोपार्जित जमीनीचे सात बारा,  कुटुंबाचे जातीचे दाखले, मतदान कार्ड, आधर कार्ड, बँक पासबुक इत्यादी वस्तू आगीत जळाले. तर पल्लेझरी येथे श्रीहरी वाघमारे यांच घर दिव्याच्या आगीत जळल्याची घटना समोर आली आहे. वाघमारे यांनी सुध्दा आपल्या घरी दिवे लावले होते. त्या दिव्यामुळे भीषण आग लागली. सुदैवाने कुटुंबातील व्यक्तींना कसलीच जिवीतहानी झालेली नाही.