नाशिकमधील रुग्णसंख्या १२ वर; एकाचा मृत्यू

मालेगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाच करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यत करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १२ झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३१ जणांचे अहवाल नव्याने प्राप्त झाले. त्यातील नाशिक शहरातील २६, तर मालेगावमधील सहा जणांचे अहवाल नकारात्मक आले. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या पथकांतील अंगणवाडी सेवक-सेविका, आशा आदीच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे मंगल कार्यालय वा हॉटेलमध्ये विलगीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे

लासलगाव आणि नंतर नाशिकच्या गोविंदनगर भागात प्रत्येकी एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर बुधवारी एकाच दिवसांत मालेगावातील पाच जणांचे अहवाल सकारात्मक आले होते. अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच त्यातील एकाचे निधन झाले होते. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या संशयितांपैकी आणखी पाच जणांचे अहवाल सकारात्मक असल्याचे गुरुवारी आढळून आले. त्यातील चौघे शहरातील असून एक जण चांदवड येथील आहे.

दोन दिवसांत मालेगावात नऊ  रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. मालेगावमधील बराचसा भाग प्रतिबंधित करण्यात आला असून तेथे मास्क लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. शिवाय सध्या प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी पालिकेची ४०० पथके सर्वेक्षण करीत आहेत. सुरक्षितता म्हणून सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील विलगीकरण करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या दहा जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने गेली काही दिवस करोना संशयितांवर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टर, १८ परिचारिका यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून शहरात जे नऊ  करोना बाधित रुग्ण आढळून आले, त्या सर्वाच्या घरातील नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. आतापर्यंत त्यातील ६१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बाधितांच्या घरातील नातेवाईकांनंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, करोनाचा वाढता धोका लक्षात घेता तात्काळ निदान होऊन उपचार सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मालेगावात तातडीने तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी आता पुढे येत आहे. सर्व सोयींचे केंद्रीकरण नाशिक शहरात न करता ज्या ठिकाणी हा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे आणि भविष्यातही जेथे अशा सोयीची जास्त आवश्यकता पडू शकते अशा ठिकाणी विषाणू तपासणी प्रयोगशाळा होणे न्यायोचित होईल असे मत सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड्. शिशिर हिरे यांनी मांडले आहे.

५९ अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ११ नागरिकांची तपासणी करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात १०६ संशयितांना दाखल करण्यात आले. जिल्हा परिसरातील ९० रुग्णांचे अहवाल प्रलंबित असताना शुRवारी ३१ अहवाल प्राप्त झाले. नाशिकमधील २६ आणि मालेगावमधील पाच रुग्णांचा यात समावेश आहे. हे सर्व अहवाल नकारात्मक असून अद्यप ५९ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.