अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या बर्डी आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीसह पाच विद्यार्थी डोंगराची दरड कोसळल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी उघड झाली. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी डोंगरावरची माती खणून शाळेतील क्रीडांगणात टाकण्याच्या कामासाठी जुंपले होते. डोंगराची खोदाई सुरू असतानाच ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेवेळी आश्रमशाळेत शिक्षकच गैरहजर असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनाच विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी धडपड करावी लागली. बर्डी आश्रमशाळा नेहमीच गैरकारभारामुळे चर्चेत राहिली आहे. आता तर या विद्यार्थ्यांना गैरपद्धतीने डोंगर खोदून मैदानासाठी माती टाकण्याचे काम शिक्षकांकडून देण्यात आल्याचे उघड झाले आहे. शनिवारी सकाळपासून आश्रमशाळेतील विद्यार्थी जवळच्या डोंगराची माती खोदून आश्रमशाळेच्या आवारातील क्रीडांगणात जमा करत होते. याच दरम्यान या डोंगराची दरड कोसळून पाच विद्यार्थी अडकले. या विद्यार्थ्यांना प्रारंभी उपचारासाठी मोलगी ग्रामीण रुग्णालय आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत विकास तडवी (१५), मनोहर वसावे (१२), दारासिंग राऊत (१२), गणेश तडवी (१४) हे चार विद्यार्थी तर रंजना तडवी (११) या विद्यार्थिनीस मार बसला आहे. दरड कोसळणे सुरू होताच इतर विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले. या घटनेवेळी आश्रमशाळेत फक्त कंत्राटी कर्मचारीच हजर असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आश्रमशाळेतील कारभार चव्हाटय़ावर आला आहे.