प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांच्या निधनानंतर घरमालकाने त्यांचे घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यशवंत देव यांच्या दादरमधील वसंत सोसायटीतील घराबाहेर घरमालकाने घर खाली करण्यासंदर्भात नोटीस लावली आहे. यशवंत देव यांच्या अस्थींचे विसर्जन होण्यापूर्वीच ही नोटीस लावण्यात आली असून या असंवेदनशील प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

दादरमधील शिवाजी पार्क येथील वंदन सोसायटीत यशवंत देव हे वास्तव्यास होते. गेल्या ७५ वर्षांपासून ते या घरात राहत होते. याच घरात त्यांनी अनेक अजरामर गीते सूरबद्ध आणि संगीतबद्ध केली होती. मात्र, यशवंत देव यांच्या निधनानंतर घरमालकाने हे घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
बुधवारी अस्थी विसर्जनासाठी यशवंत देव यांचे पुतणे ज्ञानेश हे वंदन सोसायटीतील घरी गेले असता त्यांना घराबाहेर एक नोटीस लावलेली दिसली. घर खाली करण्यासंदर्भात ही नोटीस लावण्यात आली होती. हा प्रकार पाहून ज्ञानेश यांना धक्काच बसला. घरमालकाने कोणतीही पूर्वकल्पना न देताच ही नोटीस लावल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश हे पुण्यात राहतात.

यशवंत देव यांच्या निधनाच्या तीन दिवसांच्या आतच घरमालकाने घर खाली करण्यासाठी नोटीस लावणे कितपत योग्य, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. घरमालक दिलीप चौधरी आणि ओजस चौधरी यांनी ही नोटीस लावल्याचे सांगितले जाते. याबाबत चौधरी यांच्यावतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, शिवाजी पार्क परिसरातील रानडे रोड येथे वंदन ही इमारत आहे. १९६० च्या सुमारास ही इमारत दत्तात्रय चौधरी यांनी विकत घेतल्याचे सांगितले जाते. दत्तात्रय यांना चार मुलं होते. यातील दिलीप यांच्या मालकीच्या घरात यशवंत देव राहत होते.