वाळवंटातील अनेक मंदिरे पाण्याखाली

उजनी आणि वीर धरणातून मोठा विसर्ग सुरू केल्यामुळे येथील चंद्रभागा नदीला पूर आला असून, काठावरील भक्त पुंडलिक यासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

उजनी धरणातून ७० हजार क्युसेक आणि वीर धरणातून १३ हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग भीमा नदीत करण्यात येत आहे. यामुळे पंढरपुरातील भीमा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहात आहे. या पुरामुळे वाळवंटातील भक्त पुंडलिकसह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठी राहणाऱ्यांचे स्थलांतर केले आहे.

जिल्ह्याची वरदायिनी ठरलेली उजनी धरण १०९ टक्के भरले आहे. सध्या उजनी धरण क्षेत्र आणि पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे ही पूर्णक्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग भीमा नदीला येऊन मिळतो. तर वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी नीरा नरसिंगपूर येथील संगमातून भीमा नदीत येते. यामुळे भीमेच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी उजनी धरणातून ७० हजार क्युसेक, तर वीर धरणातून १३ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तर दौंड येथून २८ हजार कुसेक पाणी उजनी धरणात येत आहे.

सध्या वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून घाटांना पाणी लागले आहे. भीमा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली आहे. पंढरपूर शहरासह नदीकाठच्या गावातील लोकांनादेखील सुरक्षित स्थळी हलवण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे. दरम्यान, शनिवारी एकादशी आहे. एकादशीला भाविक स्नान करण्यासाठी नदीवर येतात. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजण्याची मागणी भाविकांतून होत आहे.