सलग सहाव्या दिवशी सांगली आणि कोल्हापुरात पुराचा कहर सुरुच आहे. आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतं आहे. ग्रामिण भागात जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. कोल्हापुरात कालपासून दीड फूट पाणी कमी झालं आहे. मात्र पावसाची संततधार सुरुच आहे त्यामुळे लोकांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. वीज नाही, घरात पाणी, रस्ते कोलमडलेले, पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती कायम आहे. अशात एकमेकांना हात देत संकटांचा सामना ग्रामस्थ आणि कोल्हापूरकर करत आहेत.

पंचगंगा नदीची पातळी १ ते दीड फूट कमी झाली आहे. तरीही पुराचा धोका कायम आहे. कारण ही म्हणावी तितकी कमी घट नाही. दरम्यान शिरोळ तालुक्यातील आल्यास गावातले नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत आणि ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी नौदलाने पुढकार घेतला आहे. सकाळी सहा वाजताच नौदलाची १४ पथकं या गावातल्या नागरिकांना वाचवण्यासाठी त्या दिशेने रवाना झाली आहेत. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. मात्र सांगलीत पावसाचा जोर ओसरला आहे.

सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या घराबाहेरही पाणी साठलं होतं. ते हळूहळू ओसरु लागलं आहे. सांगलीत पावसाने काहीशी उसंत घेतली आहे त्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात मात्र पावसाचा कहर सुरुच आहे. सांगली, कोल्हापुरात अडकलेल्या लोकांना सेवाभावी संस्था मदत करत आहेत. इतकंच नाही अनेक कलाकारांनीही त्यांच्या परिने पूरग्रस्ताना मदत करण्यास सुरुवात केली आहे. पूर पर्यटनासाठी येऊ नका असंही या कलाकारांनी बजावलं आहे.