04 July 2020

News Flash

विविध प्रयोगांनी मळा ‘फुल’ला!

गेल्या १० ते १२ वर्षांपासून किरण पाटील फुलांची शेती करत आहेत. ते विविध फुलांची शेती करत असले तरी मोगरा आणि सोनचाफ्याची अधिक लागवड करत आहेत.

शेतीचे  प्रयोगवंत : कल्पेश भोईर

भात, भाजीपाला, केळी, विविध फुले अशी विविध पिके वसई परिसरातील शेतीतून घेतली जातात. काळाच्या ओघात वसईतील पारंपरिक शेती हळूहळू नष्ट होऊ लागली असली तरी काही शेतकरी विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतात. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा.

वसईचा परिसर केळीच्या बागा, भातशेती, फुलशेती, नारळ इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात विविध प्रकारची शेती केली जात आहे. मात्र उत्पादनाच्या दृष्टीने आणि चांगले उत्पन्न मिळावे यासाठी फुलशेती करण्याकडे अधिक शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे अर्नाळा येथील प्रगतिशील शेतकरी किरण पाटील. मागील काही वर्षांपासून आई-वडिलांनी जोपासलेली पारंपरिक फुलशेती टिकवून त्यावर बदलत्या काळानुसार वेगवेगळे आधुनिक प्रयोग करून या शेतीतून अधिक उत्पादन केले आहे.

गेल्या १० ते १२ वर्षांपासून किरण पाटील फुलांची शेती करत आहेत. ते विविध फुलांची शेती करत असले तरी मोगरा आणि सोनचाफ्याची अधिक लागवड करत आहेत. ही दोन्ही फुले अधिक उत्पादन देणारी असून बाजारपेठेतही त्यांना अधिक मागणी असते. वसई परिसरात मोगऱ्याला ‘राजा पीक’ किंवा ‘हुकमी पीक’ असे संबोधले जाते. याचे कारण म्हणजे हे पीक शेतकऱ्यांना कधीही तोटय़ात टाकत नसून चांगले उत्पन्न मिळवून देते. त्यामुळेच पाटील यांनी विविध प्रकारच्या मोगऱ्याची लागवड केली आहे. त्यांच्या दीड एकर शेतात मोगरा आणि दीड एकर शेतात चाफा लावण्यात आलेला आहे. साधा मोगरा, मदन मोगरा यांसह बंगळूरु येथून आणलेला गंडू मलाई मोगरा यांनी त्यांची शेती फुलली आहे.

या मोगऱ्याची रोपे ठरावीक अंतर ठेवून लावण्यात येत असून त्या ठिकाणी खुंट तयार करण्यात येतात. सुरुवातीला ही खुंट बांबू किंवा लाकडापासून तयार केली जात होती. मात्र ही बाब अतिशय खर्चीक आणि वारंवार तयार करावी लागत होती. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून पाटील यांनी घरच्या घरी सिमेंटपासून लहान खुंट तयार केली आहे. तसेच सव्वा इंच पीव्हीसी पाइपचा वापर करून मंडप तयार करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रयोगाचे परिसरात खूप कौतुक झाले आणि त्यानंतर अन्य शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात हा प्रयोग केला.

या प्रयोगाबरोबरच शेतीविषयक अधिक माहिती घेण्यासाठी शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शने यांमध्ये सहभागी होऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक चांगली शेती करण्यावर पाटील यांचा भर असतो. त्याशिवाय आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा वापर अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी ते मार्गदर्शनही करतात.

फुलशेतीची योग्यरीत्या मशागत करणे आवश्यक असते. त्यासाठी अधूनमधून झाडांची छाटणी, कीटकनाशकांची फवारणी, खत टाकणे आदी कामे ते नित्यनियमाने करतात. त्यामुळेच मोगरा व सोनचाफा हे पीक चांगल्या प्रकारे आपल्या शेतात फुलत असल्याचे त्यांनी सांगितले. मदन मोगऱ्याचा हंगाम दोन ते अडीच महिने असतो तर साध्या मोगऱ्याचा हंगाम हा सहा ते आठ महिन्यांचा असतो. सोनचाफा आणि मोगरा यांबरोबरच तगर, सायली, गुलाब, कागडा अशा विविध फुलांची लागवडही त्यांनी केली आहे. दरवर्षी या फुलशेतीमधून मोठय़ा प्रमाणात फुलांचे उत्पादन निघत असल्याने फूल काढण्यासाठी ६ शेतमजूर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनाही चांगला रोजगार मिळाला आहे.

मोगरा व चाफा या फुलांना सणासुदीच्या काळात अधिक मागणी असते. अशा वेळेत दादरच्या फुल बाजारात ही फुले विक्रीसाठी जात आहेत. मोगरा प्रतिकिलो ३२० ते ३५० तर चाफा १२० ते १४० शेकडा या दराने विकला जात आहे. त्यामुळे यातून वार्षिक चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. त्यामुळे आताच्या काळात जर चांगली मेहनत केली तर फुलशेती हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. त्यामुळे ही शेती अधिक चांगल्या प्रकारे बहरण्यासाठी व भविष्यातही ही शेती टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत किरण पाटील यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:32 am

Web Title: flower banana vegetable app 94
Next Stories
1 अकलूजच्या घोडेबाजारात साडेपाच कोटींची उलाढाल
2 मेंढय़ाला तीन लाखाचा दर
3 पश्चिम विदर्भात ७२ टक्के क्षेत्रातील पिकांची हानी
Just Now!
X