गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादातून २५० ते ३०० गणेशभक्तांना विषबाधा झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील नारायणपूर गावात घडली. विषबाधा झालेल्यांवर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खामगावमधील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नांदुरा तालुक्यातील  नारायणपूर गावातील ग्रामस्थांनी अनंत चतुदर्शीच्या पूर्वसंध्येला महाप्रसाद अर्थात भंडा-याचे आयोजन केले होते. सुमारे ५०० गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मात्र संध्याकाळनंतर या लोकांना उलटी, मळमळ, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. महाप्रसादात गंगाफळाची भाजी खाल्ली होती. त्यामुळेच त्रास झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेची माहिती मिळतात सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णांची मदत केली.  घटनेची माहिती मिळताच आ.चैनसुख संचेती यांनी रूग्णालयाला भेट देऊन रूग्णांची चौकशी केली. काही रूग्णांची प्रकृती गंभीर आहे.

गणेशोत्सवात भंडारा किंवा महाप्रसादाचे आयोजन करताना अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता नांदुरामधील ग्रामस्थांनी अशी परवानगी घेतली होती का याचा तपास केला जात आहे.