वनखात्याकडून चार हत्तींचाही वापर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : पांढरकवडा परिसरातील  वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी पुन्हा एकदा वनखात्याचा चमू संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. या मोहिमेकरिता चार हत्ती आणि मध्यप्रदेशातील पशुवैद्यकांचा चमू पांढरकवडय़ात दाखल झाला आहे. वाघीण आणि तिच्या बछडय़ांचा शोध घेण्यासाठी कॅमेरा ट्रॅपची देखील मदत घेतली जात आहे. बुधवारपासून ही मोहीम सुरू होईल.

वनमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांच्यासह अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये आणि सुमारे २०० जणांचा चमू या मोहिमेत सहभागी आहे. त्याची सूत्रे ‘बेस कॅम्प’मधून हलवली जात आहेत. सद्यस्थितीत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यक डॉ. चेतन पाथोड, सेमिनरी हिल्सच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे डॉ. अंकुश दुबे, पोलीस खात्यातील पाच नेमबाज तसेच वनखात्याचे अधिकारी या मोहिमेत आहेत.

दोन-चार दिवसांपूर्वी वाघिणीने ज्याठिकाणी शिकार केली होती, त्या ठिकाणापासून काही  अंतरावर वाघिणीच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत.

एका गुराख्याला ती शिकार ओढत असल्याचे दिसत होते, पण वाढलेल्या गवतामुळे नेमके स्पष्ट होत नव्हते. वाढलेले गवत आणि लँटेना वनस्पती देखील वाघ शोध मोहिमेत प्रमुख अडचण आहे. वाघिणीला पकडण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत कुठलीही त्रुटी राहू नये, याचा प्रयत्न करण्यात आला असून गावकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले आहे. ते सुद्धा बेसकॅम्पला येऊन सहकार्याची भूमिका घेत आहेत.

सकाळी साडेपाचला वनखात्याचे कर्मचारी मोहिमेवर निघतात.  रात्री नऊ वाजता परत येतात. गावकऱ्यांशी संवाद, वाघिणीचे अस्तित्व असलेल्या भागात गावकरी जाऊ नये म्हणून काळजी, गस्त, कॅमेरा ट्रॅपमध्ये येणाऱ्या छायाचित्रांची तपासणी यात हे कर्मचारी व्यस्त आहेत. मोहिमेदरम्यान वाघिणीच्या बछडय़ांना इजा होऊ नये यादृष्टीने सुद्धा काळजी घेतली जात आहे. वाघिणीकरिता रेडे सोडण्यात आले आहेत, त्यांच्या शिकारीसाठी ती आली तर तिला जेरबंद करता येईल हा यामागचा उद्देश आहे.  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या या संयुक्त मोहिमेला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department use four elephants to catch tigress
First published on: 26-09-2018 at 02:59 IST