आदिवासींना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी वनहक्क परिषदांचे आयोजन करण्यात येणार असून त्याची सुरुवात कळवणपासून होत आहे. शेतकरी, आदिवासी व गरीब जनतेला न्याय देण्यासाठी तसेच अन्यायाविरूध्द लढा देण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव सज्ज राहणार असल्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
येथील आरकेएम विद्यालयात आयोजित आदिवासी वनहक्क परिषद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कॉंग्रेस सचिव मोहन प्रकाश, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. आदिवासींच्या संर्दभातील अधिकार व वनहक्क कायदे २००६ मध्ये काँग्रेस सरकारने अमलात आणले. कॉंग्रेसच्या कारकिर्दीत या कायद्यांची यशस्वीपणे अमलबजावणी राबवून आमच्या पक्षातर्फे खऱ्या अर्थाने आदिवासी व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. कूळ कायदा, वन कायदा, अतिक्रमित जमिनी संदर्भातील कायदा हे सर्व कायदे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कारकिर्दीत झालेले आहेत. गरिबांसाठी सुरु केलेली इंदिरा आवास घरकुल योजना तसेच अनेक शासकीय व आदिवासींच्या अनुदानित योजना बंद करण्याचा सपाटा सत्ताधारी भाजप-सेना सरकारच्यावतीने सुरु झाला असून त्यांचे हे अन्यायात्मक काम कॉंग्रेस पक्ष कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे चव्हाण यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टातून पिकवलेल्या कांद्याचे वांदे झाले असून कांद्याला दोन हजार रूपये हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. संवेदना नसलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी व गोरगरीब जनतेने एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन चव्हाण यांनी केले. प्रास्तविक आयोजक अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी केले. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश, मध्य प्रदेशचे गटनेते बाळा बच्चन, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ. निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री राजेंद्र गावित, शैलेश पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.