काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांचा शुक्रवारी अर्ज दाखल करताना किती व्यक्तींनी अर्ज सादर करायचा, याचा मोठा घोळ झाला. उमेदवार व त्यांच्यासह चौघे असा नियम आहे. पण काँग्रेस कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आधीच घुसले होते. नेमके शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना प्रवेशद्वाराजवळ अडविण्यात आले आणि अर्ज दाखल करण्यासाठी ताटकळवले. शेवटी त्यांना बरोबर घेण्यासाठी उमेदवार पाटील व आमदार झांबड यांना बाहेर जावे लागले. ते आल्यानंतर दोन अर्ज सादर करताना वेगवेगळे गट तयार करण्यात आले.
प्रचारफेरीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या उमेदवार पाटील यांच्यासमवेत काँग्रेसचे भलतेच कार्यकर्ते आत शिरले. मंत्री दर्डा, आमदार झांबड, एम. एम. शेख, सतीश चव्हाण, विक्रम काळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांच्यासह अर्ज दाखल होणार होता. मात्र, दर्डा अडकले. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यासाठी दोघांना जावे लागले. दरम्यान, सगळय़ा आमदारांनी पहाऱ्यावर असणाऱ्या पोलिसांच्या खुच्र्यावर ताबा मिळवला. पूर्वीच काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन थांबले होते. त्यांच्यामुळे गर्दी वाढली. पोलीस निरीक्षकांना स्वत: दारासमोर थांबावे लागले. तेव्हा आमदार झांबड व पोलीस अधिकाऱ्यांत वादावादीही झाली. तुम्ही फारच कडक बंदोबस्त करायले का, असे झांबड म्हणाले. तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी आयोगाच्या सूचना आहेत, असे सांगितले. अखेर दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. पहिला अर्ज दाखल करतेवेळी दर्डा, सतीश चव्हाण यांच्यासह नितीन पाटील यांची पत्नी व अन्य एकास प्रवेश देण्यात आला, तर दुसऱ्या अर्जासाठी दुसरी टीम पाठविली. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरताना उडालेला गोंधळ लक्षणीय होता.
९ उमेदवारांचे ११ अर्ज
दिवसभरात ९ उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले. आतापर्यंत २४ उमेदवारांचे ३१ अर्ज दाखल झाले. भारतीय क्रांती सेनेचे भानुदास रामदास सरवदे, अफसरखान पठाण, सय्यद शफीयोद्दीन वहिमोद्दीन, बाळासाहेब सराटे, तर बसपच्या वतीने इंद्रकुमार ज्ञानोबा जेवरीकर यांनी अर्ज दाखल केला. मधुकर पद्माकर त्रिभुवन, कैलाश चंद्रभान ठेंगडे, डॉ. फिरोज खान यांनीही वेल्फेअर पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला.