|| दिगंबर शिंदे

‘सुंबरानं मांडलं गा, तवाच्या येळला, चला जाऊ पंढरीला, अटलजींच्या’ असे म्हणत ढोल कैताळाच्या तालात अख्ख्या महाराष्ट्रातून धनगर समाजाचे कार्यकत्रे पंढरीला आले होते. या मेळाव्यात, समाजात अटलजी केवळ सामील झाले नाहीत तर खांद्यावर घोंगडं आणि गळय़ात धनगरी ढोल अडकवत त्यांनी तो वाजवला..! त्यांच्या या कृतीने सारेच थक्क झाले आणि भारावून गेले. वाजपेयींचे ते गजनृत्य आजही पंढरीच्या वाळवंटात घुमते आहे. समाजात दिलखुलासपणे मिसळणारा, त्यांच्या प्रश्नांना भिडणारा असा नेता पुन्हा होणे नाही..!

पंढरपूर येथे २२ जानेवारी २००४ रोजी धनगर समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी प्रमुख पाहुणे म्हणून आले  होते. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेदेखील या वेळी उपस्थित होते. या वेळी घडलेल्या या विलक्षण प्रसंगाचे साक्षीदार असलेले प्रकाश शेंडगे वाजपेयी यांच्याबद्दलच्या आठवणी सांगत होते.

वाजपेयी येणार, त्यांना पाहायला मिळणार म्हणून या मेळाव्याला लाखोंची गर्दी झाली असे सांगत शेंडगे म्हणाले, की या मेळाव्यासाठी पंढरीत एवढी गर्दी झाली होती, की आषाढी-काíतकीला येणारा तो वारकऱ्यांचा महापूरच वाटू लागला. अखेर दक्षता म्हणून पोलिसांनी पंढरीत प्रवेश करणारे चारही मार्ग रोखले. सावळय़ा विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच जनसामान्यांशी आपल्या अमोघ वाणीने संवाद साधणाऱ्या अटलजींना पाहण्यासाठीची ही गर्दी होती. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही धनगरी ढोलांचे गजनृत्य केले. धनगर समाजाची ओळख असलेले घोंगडे त्यांच्या खांद्यावर घातले आणि भंडाऱ्याची उधळण करत ‘येळकोट.येळकोट जय मल्हार!’ असा गजर सुरू झाला. या स्वागताने वाजपेयी एवढे भारावले, की ते थेट या जल्लोषात मिसळले. खांद्यावर घोंगडं आणि गळय़ात धनगरी ढोल अडकवत त्यांनीही ठेका धरला.

‘येळकोट’चा गजर करणारे, धनगरी संस्कृतीशी नाते जोडणारे एखादे नेतृत्व प्रथमच समाज पाहात होता. लोकदैवत पुंडलिकाच्या साक्षीने हे सारे पाहताना सारेच भारावले होते. लोकसंस्कृतीची खुबी ओळखून त्यांच्यात समरस होत त्यांच्याच वेषात, त्यांच्याच भाषेत, आरोळी देणारे अटलजींसारखे नेतृत्व दुर्मिळ आहे. जनतेच्या काळजाला हात घालण्याची ताकद या नेत्यामध्ये होती, असे शेंडगे यांनी सांगितले.  या वेळी वाजपेयी यांनी पाच दशकांमध्ये उपेक्षित असलेल्या धनगर समाजाला न्याय देण्याचे अभिवचन दिले होते, मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्याने हे वचन ते पूर्ण करू शकले नसल्याची खंतही शेंडगे यांनी व्यक्त केली.

..कौनसा सूर निकालू?

पंढरपूरच्या धनगर मेळाव्यात गजनृत्याचा आनंद घेणाऱ्या वाजपेयींबाबत मिरजेच्या सतारीबाबतचीही एक आठवण सध्या सांगितली जात आहे. १९८३ साली वाजपेयी मिरज दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांनी त्यांना सतार भेट दिली. या वेळी या सतारीकडे पाहत वाजपेयी गमतीने म्हणाले, ‘इस मे से कौनसा सूर निकालू?’ त्यांच्या या वाक्यावर उपस्थित सारेच कलाप्रेमी, राजकीय नेते हास्यविनोदात बुडाले.