राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला पहिल्यांदाच अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यातच सकाळी सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे यामध्ये अजून भर पडली. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाकडे उपाध्यक्षपद गेल्यामुळे आता माजी खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच संतापले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण??

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी समसमान मत पडल्यामुळे अखेरीस चिठ्ठी पाडून निकाल लावण्यात आला. ज्यामध्ये अध्यक्षपद महाविकास आघाडीच्या मिनाताई शेळके यांच्याकडे तर उपाध्यक्षपदी एल.जी. गायकवाड यांनी बाजी मारली. शिवसेनेच्या शुभांगी काजवे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मीनाताई शेळके व भाजपाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांना ३०-३० अशी समान मतं पडली होती. यानंतर चिठ्ठी काढण्यात आल्यावर काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अशीच स्थिती अपेक्षित होती, मात्र महाविकासाघाडीची दोन मतं फुटली त्यामुळे भाजपाला ३२ व शिवसेनेच्या उमेदवाराला २८ मतं मिळाली. यामुळे शिवसेनेला धक्का देत भाजपाचा उपाध्यक्ष झाला.

खैरे संतापले, अब्दुल सत्तार गद्दार –

या निकालानंतर संतापलेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. अब्दुल सत्तार हे गद्दार आहेत, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका असं वक्तव्य खैरे यांनी केलंय. सत्तारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचा उपाध्यक्ष पदाचा उमेदवार पडला, त्यामुळे सत्तारांवर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी खैरेंनी केली.

काय आहे जिल्हापरीषदेतली सध्याची परिस्थिती??

औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक २३ सदस्य भाजपकडे आहेत. तर, शिवसेना-१८, काँग्रेस-१६, राष्ट्रवादी -३, मनसे १, डेमोक्राटीक १ असे पक्षीय बलाबल आहे. मागीलवेळी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची मदत घेत अध्यक्षपद मिळवले होते.