ज्येष्ठ न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे आज (दि.१५) वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. पुण्याच्या राहत्या घरी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून सावंत यांनी अनेक ऐतिहासिक घटनांवर निर्णय दिले. सावंत यांच्या निधनानंतर, “देश एका महान विधिज्ञास मुकला” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

“माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देश एका महान विधीज्ञास मुकला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असं ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी सावंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. याशिवाय, मराठा समाजाला आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेही ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते.  मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.


पी. बी. सावंत यांची 1973 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. नंतर 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. शिस्तप्रिय आणि संयमी न्यायमूर्ती म्हणून सावंत यांची ओळख होती.