गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सराकारचं खातेवाटप झालं नाही. त्यामुळे आता नाराजी उघडपणे दिसत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. अब्दुल सत्तार यांनी आज (शनिवार) आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीला लागलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धोका मानला जात आहे.

प्रसारमाध्यमांतूनच सत्तार यांच्या राजीनाम्याची माहिती मिळाली. त्यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप माहित नाही. औरंगाबादमध्येही अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जो संघर्ष सुरू आहे, त्याचा हा परिणाम आहे. सत्तार हे राज्यमंत्रिपद मिळाल्यानं नाराज होते. त्यांनी राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा स्वीकारणार नाहीत. त्यामुळे ते मंत्रिमंडळातच राहतील, असं वाटत असल्याचंही बागडे म्हणाले. अशा गोष्टींचा सरकारवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. राज्य सरकारच्या खात्यांचं अद्यापही वाटप झालं नाही. हा नाराजीचा परिणाम आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान देणार असल्याची त्यांना आशा होती. त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं. तर पैठणचे आमदार संदीप भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं होतं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं सत्तार नाराज होते. परंतु खातेवाटपापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.