धवल कुलकर्णी

करोना व्हायरसच्या  विरोधात जरी राज्याच्या यंत्रणेचा लढा सुरू असला तरी सुद्धा महाराष्ट्राच्या वनखात्याला एका वेगळ्याच आव्हानाला तोंड द्यावं लागतं आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा गैरफायदा घेऊन काही मंडळी जंगलामध्ये जाऊन वन्य प्राण्यांची बेकायदेशीर शिकार करत आहेत.

अशाच काही लोकांना वनखात्याच्या कर्मचारी यांनी कराडमध्ये अटक केली. गुरुवारी सकाळी वनखात्याच्या काही कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी मौजे बेलदरे तालुका कराड येथील नाईकबा देवस्थानच्या जवळील शेतामध्ये धाड घालून मारलेल्या रानडुकराची काटछाट करताना व त्याला भाजताना चार आरोपींना पहिले. यापैकी दोन आरोपी जरी प्रत्यक्ष जागेवरून पळून गेले असले तरी नंतर ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीने हत्येसाठी वापरलेली अवजारे सुद्धा ताब्यात घेण्यात आली.

रान डुकराला मारण्यासाठी त्यांनी एक गावठी बॉम्बचा वापर केला. या गावठी बॉम्बच्या वर प्राण्यांची चरबी लावण्यात आली होती. हा बॉम्ब  जंगलात टाकल्यावर डुक्कर त्या वासाने आकृष्ट  होते. डुकराने त्याचा चावा घेतला त्यामुळे या बॉम्बचा स्फोट झाला.

नामदेव चव्हाण, गोरख जाधव, सुधीर तांबे आणि जालिंदर जाधव अशी या आरोपींची नावं आहेत. हे सगळेजण मौजे बेलदरे तालुका कराड येथील रहिवासी आहेत. यांना वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक (सातारा) किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल रमेश कुंभार वनरक्षक आणि इतर कर्मचारी यांनी केली.