लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९६ झाली. दरम्यान, आज दोन जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४७ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यात ४३ अहवाल नकारात्मक व चार अहवाल सकारात्मक आले आहेत. करोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ५८ वर्षीय पुरुष, तसेच ४० बीघा मलकापूर येथील १० वर्षीय मुलगा, ४० व ३९ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आज आढळून आलेले रुग्ण हे करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत. दोन रुग्णांना आज खामगाव कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली. यामध्ये खामगाव येथील ३१ वर्षीय पुरुष व नांदुरा येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला, तर आजच्या दोन जणांसह आतापर्यंत ६६ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात २७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ३७ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १६११ अहवाल नकारात्मक आले आहेत.