लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनामुळे चार जणांचा बळी गेला आहे. २४ नवीन करोनाबाधित रुग्णही शनिवारी आढळून आले, तर रॅपिट टेस्टमध्ये काल आढळून आलेल्या १४ रुग्णांची नोंद आज घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २६६१ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १०९ करोनाबळी गेले आहेत.

जिल्ह्यात करोनाबाधितांची रुग्ण वाढ व रुग्णांच्या मृत्यूचे सत्र कायम आहे. जिल्ह्यातील एकूण २७० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २४६ अहवाल नकारात्मक, तर २४ अहवाल सकारात्मक आले. सध्या ४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज तब्बल चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. शासकीय वैद्याकीय महाविद्याालयात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात ५८ वर्षीय पुरुष असून ते जेतवण नगर येथील रहिवासी आहे. त्यांना २६ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्णाला २३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. हे दोन्ही रुग्ण आज उपचारादरम्यान दगावले. ओझोन रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ७७ वर्षीय महिला असून त्या नानक नगर निमवाडी येथील रहिवासी होत्या आणि अकोट येथील अंबिका लेआऊन येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

आज दिवसभरात एकूण २४ जणांचे अहवाल सकारात्मक आले. आज सकाळी १८ रुग्ण आढळून आले. त्यात आठ महिला व १० पुरुष आहेत. त्यामध्ये हिवरखेड येथील आठ जण, अकोट, खांबोरा बार्शिटाकली व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन तर बाबुळगाव जहागीर, बाळापूर, दहिहंडा, शिवाजी नगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. आज सायंकाळी सहा जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. त्यामध्ये राम नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन जण तर धाबा व शहरातील काला सोसायटी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आज १८ जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील २११४ जण करोनामुक्त झाले आहेत.