गल्लीपासून दिल्लीपर्यंत १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली, ‘जय शिवाजी, जय भवानी’ हे जयघोष फक्त महाराष्ट्रातच नाही तर माऊंट किलीमांजारो पर्वतावरही घुमले. महाराष्ट्रातल्या चार गिर्यारोहकांनी आफ्रिकेतील टांझानिया येथील माऊंट किलीमांजारो सर करत तिथे शिवजयंती साजरी केली. अनिल चंद्रकांत वाघ, क्षितीज अनिल भावसार, रवि मारुती जांभूळकर तसेच कोल्हापूरचे प्रवीण चव्हाण, अशी गिर्यारोहकाची नावे आहेत. गिर्यारोहक सुधीर दुधाने, सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली.

समुद्र सपाटीपासून या पर्वताची उंची ५,८९५ मीटर एवढी आहे. चढाई करण्यासाठी चारही गिर्यारोहकांना सहा दिवसांचा कालावधी लागला. शेवटच्या टप्प्यात पर्वतावर चढाई करताना हाडे गोठवणारी थंडी आणि अति वेगाने वारे वाहात होते, चढाई आव्हानात्मक होती. वाऱ्याच्या वेगानं पर्वत सर करताना अडचणी येत होत्या असंही चौघं म्हणाले. पण इच्छाशक्तीच्या जोरावर ही मोहीम चौघांनी यशस्वी केली आणि किलीमांजारोवर शिवजयंती साजरी केली. अनिल , क्षितीज , रवि, प्रवीण यांनी आपल्यासोबत महाराजांचा अश्वारुढ लहान पुतळातही नेला होता. शिखरमाथ्यावर पोहोचल्यावर या चौघांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत भगवा फडकवत शिवजंयती साजरी केली. जय शिवाजी जय भवानीचा जयघोष किलीमांजारोवर घुमू लागला.

गिर्यारोहक अनिल वाघ हा अग्निशमन दलात कार्यरत आहे. क्षितीज भावसार हा मुंबईत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतो. रवि जांभूळकर चिखलीतील शेतकरी कुटूंबातला असून पहिल्यांदाच तो गिर्यारोहणातील परदेशी मोहिमेत सहभागी झाला तर प्रवीण चव्हाण हे मूळचे कोल्हापूरचे असून ते टांझानियात व्यवसाय करतात. दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वात उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस खुप कमी गिर्यारोहकांनी दाखवले आहे असंही ते म्हणतात. किलीमांजारोवर शिवजंयती साजरी करताना या चौघांना पाहून अनेक परदेशी पर्यटकांच्या मनात महाराजांविषयी कुतूहल निर्माण झालं. जपान, चीन, इराक, इराण, न्युझीलंड अशा ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांनी महाराजांबद्दल विचारणाही केली असल्याचं ते म्हणाले. ३५० वर्षानंतरही तुमच्या राजाची शिवजयंती साजरी करता, ही अभिमानाची गोष्ट आहे असे कौतुकही परदेशी गिर्यारोहकांनी केलं असल्याचं ते चौघंही म्हणाले.