हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्यातून चार नविन चेहेरे विधानसभेवर निवडून गेले आहेत. श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, अलिबागमधून शिवसेनेचे महेंद्र दळवी, कर्जत मधून शिवसेनेचे महेंद्र थोरवे आणि उरण मधून भाजपचे बंडखोर महेश बालदी रायगडचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. एकाच वेळी चार नव्या दमाचे आमदार विधानसभेत पाठवण्याची  ही पहिलीच वेळ आहे.

रायगड जिल्ह्यतील सात मतदारसंघासाठी यंदा ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणूकीत प्रस्तापितांविरोधात जनतेनी कौल दिला. २४ तारखेला पार पडलेल्या मतमोजणी नंतर चार नव्या दमाचे उमेदवार रायगडकरांनी निवडून दिले. तर महाड, पनवेल येथील मतदारांनी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली. तर पेणमधून यापुर्वी विधानसभेचे प्रतिनिधीत्व करण्याचा अनुभव असलेल्या रिवद्र पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली.

श्रीवर्धनमधून राष्ट्रववादी कॉंग्रेसच्यां आदिती तटकरे, अलिबागमधील शिवसेनेचे महेंद्र दळवी , कर्जतमधील सेनेचे महेंद्र थोरवे आणि उरणमधील भाजपाचे बंडखोर महेश बालदी हे पहिल्यांलदाच विधानसभेत पोहोचले आहेत. यातील आदिती तटकरे आणि महेंद्र दळवी यांना किमान जिल्हा परीषदेतील कामकाजाचा अनुभव आहे.

मात्र महेश बालदी आणि महेंद्र थोरवे यांची पाटी एकदमच कोरी आहे. चारही आमदारांना चौघेही नवीन असल्याने त्याना सभागृहातील कामकाजाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांना सुरूवातीला काही अडचणींना सामोरे जावे लागणार असले तरी मतदार संघाच्याल विकासाच्या दृष्टीने त्यांना सभागृहातील कामकाजाची माहिती करून घ्यावी लागणार आहे

‘मी सभागृहात नवीन असणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु नेहमी नागरीकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असणार आहे . शिवाय जिल्हा परीषदेतील कामकाजाचा अनुभव आहे . सभागृहातील कामकाजाची माहिती लवकरात लवकर करून घेईन . जेणेकरून मतदार संघातील समस्यांचे निराकरण करता येईल ’

– महेंद्र दळवी , नवनिर्वाचीत आमदार