सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेत, याप्रकरणी आरोप असलेले महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, जर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारपरिषदेत बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, संजय राठोड यांना त्यांचा वरिष्ठांचा पूर्ण आशीर्वाद आहे, असा आरोप देखील केला आहे.

या पत्रकारपरिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,  माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी बोलाताना फडणवीस म्हणाले, “ ज्या महाराष्ट्र पोलीसचं नाव संपूर्ण भारतामध्ये घेतलं जातं. त्या पोलिसांची इतकी लाचार अवस्था या पूर्वी आम्ही कधीच पाहिलेलीन नाही. माझी तर खुली मागणी आहे, ते जे पुण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत, ज्यांच्याकडे ही चौकशी आहे. त्यांना तत्काळ निलंबीत केलं पाहिजे. त्यांना नोकरीवर राहण्याचा अधिकारच नाही. कारण, शपथ घेऊन ते नोकरीवर येतात व अशा परिस्थितीत सरकारची लाचारी जर ते स्वीकारत असतील आणि ढळढळीत पुरावे असताना कुठलीही कारवाई नाही. या पेक्षा अधिक पुरावे मला वाटत नाही की कोणत्याही केसमध्ये उपलब्ध होऊ शकतात. एवढे सगळे पुरावे असताना पोलीस कारवाई करत नाही आणि मंत्री राजीनामा देत नाही व सरकार त्यावर प्रतिक्रिया देत नाही. याचा अर्थ मी याचा दोष संजय राठोड यांना देणार नाही. कारण, हे स्पष्टपणे दिसतं आहे की त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना पूर्णपणे आशीर्वाद आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय इतके ढळढळीत पुरावे असताना पोलीस कारवाई करत नाही आणि मंत्री देखील राजीनामा देत नाही, असं कधीच होऊ शकत नाही.”

… म्हणून राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे – फडणवीस

तसेच, “ कायदा व सुव्यवस्थेचे जे विषय आहेत, याबद्दल तर काही बोलायलाच नको अशा प्रकारची अवस्था आहे. अवैध धंदे वाढले आहेत. महिलांवरील अत्याचार मोठ्याप्रमाणावर वाढलेले आहेत. सत्ता पक्षाचे मंत्री आणि नेते हेच सातत्याने या महिला अत्याचारामध्ये आघाडीवर आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील सर्व क्लिप्स यासंदर्भातील फोटो, या संदर्भातील संभाषणं हे सर्व असताना साधा एफआयआर देखील दाखल होऊ नये, हे आश्चर्य आहे.” असं फडणवीस म्हणाले.

शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीमधून भाजपाचे सर्व सदस्य राजीनामा देणार –
“ राज्यामध्ये या सरकारचा चेहरा उघड झाला आहे. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते असतील, की ज्यांच्यावर एका महिलेने औरंगाबादमध्ये आरोप केल्यानंतर एफआयआर दाखल झाल्यानंतर कारवाई देखील झाली नाही. धनंजय मुंडेंच्याबाबतीत त्या महिलेने तक्रार मागे घेतलेली असलीत तरी अजूनही तो प्रश्न संपलेला नाही. आम्हाला या सरकारला एवढंच विचारायचं आहे. की सामान्यांसाठी वेगळा न्याय आणि सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय आहे का? सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने आपण दिली आहे का? ही कोणती शक्ती आपण या सर्व लोकांना दिली आहे? असा आमचा सवाल आहे. म्हणून आज आम्ही आमच्या बैठकीत हा निर्णय़ केला शक्ती कायदा वैगरे सर्व फार्स आहे. कायदे करून काही त्यामधून साध्य होणार नाही. याचं कारण हे कायदे सत्ता पक्षाला लागू नाहीत, म्हणून शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीमधून भाजपाचे सर्व सदस्य आज राजीनामा देणार आहेत. जर मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नसतील, अशा प्रकारे पुरावे उपलब्ध असताना देखील जर मंत्री कायम राहणार असतील, तर मग अशा कायद्यांची आवश्यकता का आहे? म्हणून या कायद्याच्या समितीमधून जर हा राजीनामा आला नाही तर भाजपाचे आमदार हे राजीनामा देतील.” असंही फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवलं.