गडचिरोलीतील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व धुळे वरून आलेल्या १५० राज्य राखीव पोलीस दलातील(एसआरपीएफ) जवानांपैकी २९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ही दीडशे जवानांची तुकडी गेल्याच आठवड्यात धुळे येथून गडचिरोलीला दाखल झाली होती. यातील २९ पॉझिटिव्ह, तर इतर सर्व जवानांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाचे ७२, राज्य राखीव दलाचे २९, सीमा सुरक्षा दलाचे २ असे मिळून १०३ जवान करोनाबाधित आढळून आले आहेत.

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झापाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच आता संरक्षण दलातील जवानांसह पोलीसांना देखील करोनाचा संसर्ग होताना दिसत आहे.

देशभरातील करोनाबाधितांची संख्ये आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत २८ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले असून, ५५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ६ हजार ७५२ वर पोहचली आहे. यामध्ये अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ३ लाख ११ हजार ५६५ असून, आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ४६० जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.