राजकीय नेतेमंडळीच नक्षलवाद्यांना दारूगोळा व शस्त्रे पुरवतात. या नेतेमंडळींचे नक्षलवाद्यांसोबत साटेलोटे असतात, असा आरोप गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या आईने केला आहे. नक्षलवाद्यांनी कधी नेत्यांना काही केले असे ऐकिवात नाही. मात्र पोलिसांचे हत्यासत्र सुरूच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गडचिरोलीतील कुरखेडाजवळ नक्षलवाद्यांनी बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात शीघ्रकृती पथकाचे (क्यूआरटी) १५ जवान शहीद झाले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन जवानांचा समावेश आहे. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी- मोठी येथील दयानंद शहारे, लाखनी तालुक्यातील भूपेश पांडुरंगजी वालोदे आणि साकोली तालुक्यातील तीर्थक्षेत्र कुंमली येथील नितीन घोरमारे यांचा समावेश आहे.

यातील दयानंद शहारे यांची आई शकुंतला शहारे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या अकाली मृत्यूने व्यथित झालेल्या शकुंतला शहारे म्हणाल्या, नक्षलवाद्यांनी कधी नेत्यांना काही केले असे ऐकिवात नाही. मात्र पोलिसांचे हत्यासत्र सुरूच आहे. आज ‘सर्जिकल स्टाईक’ची गरज सीमेवर नव्हे तर नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याकरिता जंगलात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.