गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….असा जयघोष करत मुंबईसह राज्याच्या विविध ठिकाणी दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुंबईत महापालिकेने चौपाट्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली असून विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला.  तर पुण्यात कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

गणेश चतुर्थीला वाजत गाजत घरोघरी गणराय विराजमान झाले. शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, पुणेसह राज्याच्या विविध ठिकाणी दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला, असा जयघोष करत भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका क्षेत्रात ६९ नैसर्गिक विसर्जन स्‍थळे असून ३१ कृत्रिम विसर्जन स्‍थळे आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहित मनुष्यबळाची व्यवस्था तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहित सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातही दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात झाले. विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालघर शहरात पालघर नगरपरिषदेने तसेच राजकीय पक्षाने गणेश भक्तांसाठी तसेच विसर्जन व्यवस्थेकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी सुरू झालेले विसर्जन रात्री पर्यंत सुरू आहे.

डहाणू ,कासा,घोलवड ,वाणगाव परिसरातील तब्बल ८०० खासगी तर १२५ अशा ९२५ गणपतींना भावपूर्ण निरोप दिला. या वेळी डहाणू नगर परिषदेचे प्रशासन आणि सेवाभावी संस्थांनी गणेश विसर्जनस्थळांवर भाविकांसाठी चोख व्यवस्था केली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डहाणू नगर परिषदेत ४५० खासगी तर ५२ सार्वजनिक गणपतींना निरोप दिला. डहाणू समुद्र, आगर, डहाणू खाडी, वाढवण, वरोर, बोर्डी, चिखला, नरपड समुद्र, सूर्या नदी येथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता.