सुहास बिऱ्हाडे

करोनाच्या संकटामुळे यंदा वसईतील पावणेआठशेपैकी १५१ सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केले आहेत, तर बहुतांश सार्वजनिक मंडळांनी दहा दिवसांऐवजी दीड दिवसांचे गणपती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना विषाणूचे संकट असल्यामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. राज्य शासनाच्या निर्देशनानुसार वसई पोलीस आणि पालिकेने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाचा उत्सव साधेपणाने करण्यासाठी आवाहन केले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील मू्र्त्यां केवळ ४ फूट ठेवणे, देखावे न साकारणे, करोनाच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेणे आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या सूचना होत्या. जर शक्य असेल तर गणेशोत्सव एक वर्षांसाठी रद्द करावा असे मुख्य आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा शहरातील १५१ सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी शहरात ७७६ सार्वजनिक मंडळांचे गणेशोत्सव होते. त्यातील दीडशे मंडळे यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाहीत. यंदा मात्र एकाही पोलीस ठाण्यात गणेशोत्सव सारा केला जाणार नाही. त्याऐवजी वसईतील सात पोलीस ठाणी, उपअधीक्षक कार्यालये, अतिरिक्त अधीक्षक कार्यालय मिळून १ लाखांचे अर्थसाहाय्य मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्यात आले आहे.

दीड दिवसांचा उत्सव साधेपणाने

जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उत्सव साजरा करणार आहेत, त्यांनी दहा दिवसांऐवजी केवळ दीड दिवसांचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, यासाठी पोलीस सातत्याने  प्रयत्न करत आहेत. त्याला गणेशोत्सव मंडळे सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. यंदा वसई विरार शहरातील बहुतांश सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव दहा दिवसांऐवजी दीड दिवसांचे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक मंडळांनी यंदा आरोग्य उपक्रमावर भर दिला आहे. त्यात महाप्रसादाऐवजी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करणे, प्लाझमा दान करण्याची शिबिरे भरवणे आदींवर भर दिला आहे. तसेच भक्तांची गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. वर्गणी गोळा न करता धार्मिक विधी करून साधेपणाने उत्सव सारा केला जाणार आहे. तसेच कृत्रिम तलावात मूर्त्यांंचे विर्सन केले जाणार आहे.

गणेश विसर्जनाकरिता ५२ स्वीकृती केंद्रांची निर्मिती

भाईंदर: करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरे करताना विसर्जन मिरवणूक न करता गणेशाच्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी  विसर्जन करताना नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता पालिकेकडून ५२ ठिकाणी स्वीकृत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून करोनाचा फैलाव अधिक  वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मीरा-भाईंदर महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये शक्य असल्यास यंदा पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हॉटस्पॉट क्षेत्रातील नागरिकांना घरीच गणेश विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतर परिसरांतील नागरिकांना चौपाटी व शहरातील तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नागरिकांना गणेश विसर्जन करणे सोयीस्कर व्हावे यासाठी महापालिका प्रभाग १ मध्ये तीन ठिकाणी, प्रभाग २ मध्ये ६ ठिकाणी, प्रभाग ३ मध्ये १३ ठिकाणी, प्रभाग ४ मध्ये १६ ठिकाणी, प्रभाग ५ मध्ये ४ ठिकाणी, प्रभाग ६ मध्ये ९ ठिकाणी अशा एकूण ६  प्रभागांमध्ये ५१ ठिकाणी गणेश मूर्ती स्वीकृती केंद्रे तयार केली जाणार आहेत. त्यानंतर स्वीकृती केंद्रांतील मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

‘घरी कुणाला बोलावू नका’

पोलिसांना यंदा मंडळांच्या बैठका आयोजिक करता येत नसल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांंचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करून त्याद्वारे त्यांना उत्सवाचा कालावधी कमी करण्यास सांगण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्या अतर्ंगत मंडळांना आवाहन केले जात आहे. घरगुती गणेशोत्सव देखील अत्यंत साधेपणाने करण्याचे आवाहन केले जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव असल्याने घरगुती गणपतीच्या दर्शनासाठी बाहेरील पाहुण्यांना बोलावू नका आणि कुणाच्या घरी देखील जाऊ नका, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले आहे.

८२ मंडळांना परवानगी

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेने कुठलेही शुल्क आकारले नव्हते. मात्र मंडप उभारण्यापूर्वी परवानगी बंधनकारक केली होती. संबंधित प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त, बांधकाम परवानगी आणि अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला बंधनकारक करण्यात आला होता. एक खिडकी योजनेअंतर्गत प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात ही परवानगी मिळणार होती. गुरुवार दुपापर्यंत केवळ ८२ मंडळांनी परवानगी मागण्याचे अर्ज केले होते आणि त्यांना पालिकेने परवानगी दिल्याची माहिती पालिकेने दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व्हावा यासाठी आम्ही मंडळांना आवाहन करत आहोत. त्याला प्रतिसाद देत १५१ मंडळांनी यंदाचे उत्सव रद्द केले आहेत. येत्या दोन दिवसात आणखी मंडळे उत्सव रद्द करू शकतील. तसेच सर्वच सार्वजनिक मंडळांचे उत्सवांचे दिवस दीड दिवसांवर असावे यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत.

– विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई