वाढदिवस साजरा करण्यासाठी फार्म हाऊसमध्ये मध्यरात्रीनंतर कायदा धाब्याबर बसवून डॉल्बी सिस्टिम लावून धिंगाणा करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठी व दगड फेकून हल्ला करण्यात आला. यात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले. शहरातील डोणगाव रस्त्यावर वानकर फार्म हाऊसमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे गुंडांवरील स्थानिक पोलीस प्रशासनाचा धाक उरला नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, या घटनेप्रकरणी दहाजणांना सलगर वस्ती पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी नऊजणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर एकजण अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तथापि, ज्यांच्या फार्म हाऊसमध्ये हा धिंगाणा होऊन पोलिसांवर दगडफेक झाली, त्या फार्म हाऊसच्या मालकाला कारवाईपासून मोकळे सोडण्यात आल्याचे दिसून आले. लक्ष्मीकांत ऊर्फ सागर शिरसट, गणेश मोहन पवार, तुषार खंडोबा पवार, आकाश शिवशंकर चाटी, सूरज रमेश पवार, योगेश नागेश कोलते, विकी ऊर्फ उमाकांत चाटी (सर्व रा. दक्षिण कसबा, पाणीवेस, सोलापूर) यांचा अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलीस खात्यात नेहमीच ऊठबस असलेल्या पाणीवेस तालीम भागातील म्होरक्या चंद्रकांत वानकर यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डोणगाव रस्त्यावरील वानकर फार्म हाऊसवर रात्री जंगी कार्यक्रम आयोजिला होता. रात्री दहानंतर वानकर कुटुंबीय घरी परतले. तेव्हा मध्यरात्री उशिरापर्यंत फार्म हाऊसवर जमलेल्या अन्य तरुणांनी डॉल्बी सिस्टिमवर धिंगाणा घातला. रात्री गस्त घालत आलेल्या पोलिसांनी ध्वनिप्रदूषण वाढणाऱ्या डॉल्बी सिस्टिम तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या असता बेधुंद तरुणांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन न करता उलट, त्यांच्याशी हुज्जत घातली. एवढेच नव्हेतर पोलीस पथकावर दगड-काठय़ांनी हल्ला केला. या हल्ल्यात सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील फौजदार विश्वास भांबड यांच्यासह सात पोलीस जखमी झाले. तेव्हा घटनास्थळी पोलिसांची जादा कुमक दाखल झाली. त्यानंतर संबंधित हल्लेखोर तरुणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यातील हल्लेखोर तरुणांपैकी काहीजण पोलिसांकडील नोंदीनुसार सराईत गुंड आहेत. त्यांच्याविरुध्द यापूर्वी गुंडगिरीचे गुन्हे दाखल आहेत.