प्रेमी युगुलास मारहाण करताना त्याचे मोबाइलवर चित्रीकरण करून व्हॉट्सअपवर ते टाकून युगुलाची बदनामी करणाऱ्या ‘गनिमी कावा’ संघटनेच्या सहा जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली.

लातूरमध्ये दोन महिन्यांपूर्वी एका प्रेमी युगुलास स्वयंघोषित संस्कृती रक्षकांनी लाथा-बुक्क्याने मारहाण करून त्याचे चित्रण व्हॉट्सअपवर टाकले. गुरुवारी सायंकाळी ते एका दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होताच राज्यभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर ही चित्रफीत नेमकी कुठली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला व अवघ्या दोन तासांत हा प्रकार लातूर जिल्हय़ातील असल्याचे उघड झाले. त्यानंतर गुरुवारी रात्रीच संदीप गोडसे, अमोल खंदारे व नितीन गोडसे या तीन आरोपींना अटक करण्यात आली.
गनिमी कावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे, राकेश गोडसे व अक्षय बनसोडे हे फरारी आहेत. हे सर्व साखरा, तालुका लातूर येथील आहेत.
दरम्यान, हा प्रकार निंद्य आहे आणि ही आमची संस्कृती नाही, असे नमूद करीत पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, असे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

दहशत पसरवण्याचा प्रताप अंगलट!
३० नोव्हेंबर २०१४ ला लातूर-मुरूड रस्त्यावर साखरा पाटी ते अंकोली दरम्यान प्रेमी युगुलास सायंकाळच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यातील मुलीला पालकाच्या स्वाधीन करून संघटनेचे कार्यकत्रे निघून गेले. मात्र, व्हॉट्सअपमुळे या प्रकाराची चर्चा पसरली. आणखी किती युगुलांबाबत असे प्रकार घडले असावेत का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.