औरंगाबाद शहराला इतिहास आहे हे आपल्याला ठाऊक आहेच.मात्र या ऐतिहासिक ठेवा असलेल्या या शहरात सध्या साम्राज्य आहे त कचऱ्याचे. गल्लो-गल्ली कचऱ्याचे ढिग साठले आहेत. आठवडाभराच्या कचरा कोंडीतून आता दुर्गंधी पसरू लागली आहे. कचऱ्याचा हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेला. मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून पालकमंत्री दीपक सावंत काय तोडगा काढणार याकडे सगळ्या औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रश्नावर आपण हतबल असल्याचे जाहीररित्या स्पष्ट केले आहे. महापालिका प्रशासन कचराकोंडी फोडण्यात अपयशी ठरल्याने मनपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा प्रश्न नेऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

मागील ३० वर्षांपासून औरंगाबाद शहराचा कचरा शहरालगत असलेल्या नारेगाव परिसरात टाकला जातो. या कचरडेपोमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याच सांगत परिसरातील सुमारे १५ गावांमधील नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन उभारले आहे. त्यामुळे महापालिकेची कचराकोंडी झाली आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी पालिकेने पर्यायी जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र जागा अद्यापही महापालिकेला मिळालेली नाही.

नारेगाव परिसरातील नागरिकांनी या कचरा डेपोच्या विरोधात अनेकवेळा आंदोलने केली.  दिवाळीत नागरिकांनी निर्वाणीचा इशारा देत चार दिवस आंदोलन केले होते. त्या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे महापालिकेच्या मदतीला धावून आले. नागरिकांनी दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीत महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री खेळ केल्याने नागरिकांचा रोष वाढला असून, आंदोलनाचा तब्बल आठवडा उजाडूनही कचराकोंडीवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शहरात  कचऱ्याचे ढिग साचून आहेत. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र कायम असले, तरी तोडगा निघत नाही. आता औरंगाबादकरांना अपेक्षा आहे ती पालकमंत्री दीपक सावंत यांच्याकडूनच!