04 August 2020

News Flash

एक महिन्यानंतरही जनजीवन विस्कळीतच

रायगडमधील बागायतदार मदतीच्या प्रतीक्षेत

(छाया :  दीपक जोशी)

हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळाला आज, शुक्रवारी एक महिना पूर्ण होत असताना, अद्यापही रायगड जिल्हा वादळाच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरू शकलेला नाही. वादळाने विस्कळीत झालेले जनजीवन आजही पूर्वपदावर आलेले नाही. घरांच्या नुकसानाची शासकीय मदत पोहोचली असली तरी बागायतदारांच्या झोळीत महिन्याभरानंतरही काहीच पडलेले नाही. १९० गावांचा वीजपुरवठाही अद्याप खंडित आहे.

निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला रायगड जिल्ह्य़ाच्या किनाऱ्यावर धडकले. ताशी ११० किलोमीटर वेगाने आलेल्या वादळाने किनारपट्टीवरील भाग उद्ध्वस्त केला. सहा जणांचा मृत्यू झाला. मोठी वित्तहानी झाली. १ लाख ८३ हजार घरांची पडझड झाली. २ हजार ४०० कुटुंबे कायमची बेघर झाली. ११ हजार ४८० हेक्टरवरील बागायतींचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले. १७ हजार विजेचे खांब उन्मळून पडल्याने १ हजार ९७६ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. वादळाचा प्रकोप भयावह होता.

या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. मात्र अजूनही वादळाच्या धक्क्यातून लोक सावरू शकलेले नाहीत. जिथे आभाळच फाटले आहे तिथे ठिगळ कुठे लावायचे, हा प्रश्न येथील आपद्ग्रस्तांना पडला आहे. उद्ध्वस्त झालेल्या बागायतींची नव्याने उभारणी करण्याचे आव्हान आहे.

वादळामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने ३७५ कोटींची मदत जाहीर केली. तसेच मदतीच्या निकषात बदल करून त्यात वाढही करण्यात आली. आवश्यक सर्व निधी तातडीने उपलब्ध करून दिला. मदत वाटपाचे कामही सुरू झाले. प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. घरांच्या नुकसानीची बरीच मदत पोहोचली देखील आहे, पण बागायतीच्या नुकसानीसाठी जाहीर झालेली मदत अजून मिळालेली नाही.

वादळामुळे विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा नव्याने बसविण्यासाठी नागरिकांनी धडपड सुरू केली आहे. शासकीय मदतीची वाट न पाहता अनेक लोकांनी घर आणि बागायतीच्या दुरुस्तीची कामे सुरु केली आहे. घरांची दुरुस्ती येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, बाधित गावांचा वीजपुरवठाही सुरू होईल, पण वादळाने नामशेष झालेल्या बागांची उभारणी कशी होणार, हा प्रश्न बागायतदारांना पडला आहे.

शाळादुरुस्तीचे आव्हान

वादळात सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा, अंगणवाडय़ा, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, समाजमंदिरे यांचेही मोठे नुकसान झाले, जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५१ शाळांचे नुकसान झाले. १५०० शाळांचे अंशत: नुकसान झाले, तर ५१ शाळा पूर्णपणे कोसळल्या आहेत. २ हजार ३९६ वर्गाचे नुकसान झाले आहे. माणगाव तालुक्यात सर्वाधिक २७१ शाळांचे नुकसान झाले आहे. याशिवाय २१२ खासगी शाळांनाही वादळाचा फटका बसला. या शाळांच्या दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी लागणार आहे. मात्र त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. श्रीवर्धन, म्हसळा, गोरेगाव, माणगाव १९० गावांमधील वीजपुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. दुसऱ्या बाजूला सिमेंट पत्र्यांचा तुटवडा असल्याने घरांच्या दुरुस्तीत अडचणी येत आहेत.

मदत वाटपाची स्थिती

वादळानंतर आपद्ग्रस्तांसाठी ३७५ कोटी रुपयांची तातडीची मदत राज्य सरकारने दिली. यापैकी घरांची पडझड झालेल्या १ लाख ३८ हजार कुटुंबाना १२९ कोटी ६२ लाख रुपयांची मदतीचे वाटप करण्यात आली. कपडे आणि भांडय़ाचे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना ४ कोटी ७६ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मृत जनावरांसाठी नुकसानभरपाई म्हणून ४९ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मच्छीमारांना १५ लाख ९३ हजार रुपयांचे वापट करण्यात आले. बागायतदारांना आत्तापर्यंत ३ कोटी ७७ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

मदत जमा करण्यात अडचण 

घरांपाठोपाठ आता बागायतीच्या नुकसानीसाठी मदत वाटपाचे काम सुरू झाले आहे. मात्र नुकसानग्रस्त बागायतदारांच्या सातबारावर अनेक नावे आहेत. त्यामुळे मदत कोणाच्या खात्यात जमा करावी, हा प्रश्न प्रशासकीय यंत्रणांसमोर आहे. त्यामुळे आपद्ग्रस्तांनी मदत कोणाच्या खात्यात जमा करावी हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्यावरील इतर सर्व खातेदारांनी संबधित व्यक्तीच्या नावाने ना हरकत पत्र देणे आवश्यक आहे.

बागायतदारांना पूर्वी हेक्टरी १८ हजार मदत दिली जात होती. राज्य सरकारने त्यात वाढ करून हेक्टरी ५० हजार मदत देऊ केली आहे. कोकणातील बागायतदार अल्पभूधारक आहेत. त्यामुळे त्यांना झाडांच्या नुकसानीच्या संख्येनुसार मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर बागांच्या पुनर्लागवडीसाठी फळबाग लागवड योजना आम्ही पुन्हा कार्यान्वित केली आहे.

– आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

शासनाने बागायदारांना देऊ केलेली हेक्टरी ५० टक्के मदत अपुरी आहे. नुकसान झालेल्या झाडांच्या संख्येनुसार मदत द्यायला हवी. सरकारने कोकणवासीयांना मदत देताना हात आखडता घ्यायला नको. राज्य सरकारने आपद्ग्रस्तांना पाच लिटर रॉकेल देण्याची घोषणा केली, परंतु प्रत्यक्ष दोन ते तीन लिटरच दिले. धान्यवाटपाची स्थिती वेगळी नाही, अद्याप अनेक गावांतील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.

– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 12:20 am

Web Title: gardeners in raigad waiting for help abn 97
Next Stories
1 आक्रमक राजकारण यशस्वी होणार का ?
2 कोकणात तुटपुंजी मदत, अनेक खेडी अंधारात
3 उसाच्या फडात ग्रंथवाचनाचा जागर
Just Now!
X