गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सातत्याने होणारे नुकसान लक्षात घेता नुकसान टाळण्यासाठी आणि नुकसानग्रस्तांना त्वरित अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्यात हलगर्जीपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सिन्नर तालुक्यात सलग तीन दिवस गारपीट झाली. गारपिटीमुळे संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाल्याचे चित्र असून या परिस्थितीची पालकमंत्र्यांनी रविवारी पाहणी केली. पांचाळे, शिंदेवाडी, उजनी, पुतळेवाडी, दहीवाडी, सोमठाणे, खंडागळी या गावांना भेट देत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि यापुढे नैसर्गिक आपत्तीत कमीतकमी नुकसान व्हावे, यासाठी काय उपाय करता येणे शक्य आहे त्याची माहिती महाजन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. पीक विमा योजनेच्या स्वरूपात बदल करून शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात साहाय्य करण्याचा शासनाचा विचार आहे. शेतीवर प्लास्टिकचे आच्छादन असल्यास गारपिटीने होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी होत असल्याने द्राक्ष बागायतदारांना असे प्लास्टिक आच्छादन कमी किमतीत उपलब्ध करून देणे आणि पीक आणेवारी पद्धतीत बदल करण्यासाठीही प्रयत्न होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या वेळी बहुतांश प्रमाणात शेतकऱ्यांनी पंचनामे व्यवस्थित होत नसल्याची आणि अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्तांना उर्मटपणाची वागणूक देण्यात येत असल्याची तक्रार केली. या तक्रारींची दखल घेत महाजन यांनी अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देतानाच या कामात हलगर्जीपणा दाखविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला. खरिपाच्या नुकसानीची रक्कम बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असून पंचनामे पूर्ण होताच शेतक ऱ्यांना त्वरित साहाय्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. गारपिटीमुळे गळालेले द्राक्षांचे घड, कांदा, गहू, डाळिंब आदी पिकांची अवस्था पाहून महाजन स्तंभित झाले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांनी दिला. महाजन यांच्यासमवेत आ. बाळासाहेब सानप, माजी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, पोलीस अधीक्षक संजय मोहिते आदी उपस्थित होते.