बेटी पढाओ.. कसे? कुठपर्यंत?

बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>

बुशरा कारभारी शेख आठवीत ए-ग्रेडमध्ये पास झाली. शहरातील मुलांमध्ये उठून दिसेल, अशी तिची गुणवत्ता. पण काय कामाची? कारण तिची शाळा आता बंद झाली. धामणगावात पुढील शिक्षणाची सोय नाही. उर्दूतून मराठीत प्रवेश घेतला तरी प्रश्न सुटणारा नाही.. शिक्षिका शेख सादिया अल्ताफ सांगत होत्या. बुशराला मात्र शिकायचे आहे. पण वडील २० कि.मी.वरील शाळेत पाठवण्यासाठी राजी होणार नाहीत, हे तिलाही माहितीय. एक तर मैत्रीण खुशियासारखे अल्पवयातच लग्न होईल किंवा अल्माससारखा अकाली मृत्यू येईल, अशी दोन उदाहरणे तिच्यापुढे. ही परिस्थिती केवळ धामणगावची नाही, जिल्ह्य़ातील ४७ गावांमध्ये नववी-दहावीचे शिक्षण नसल्यामुळे बुशरा शेखसारख्या अनेक जणींना शाळेवाचून वंचित राहावे लागत आहे.

औरंगाबादपासून ३० कि.मी. अंतरावरील धामणगाव हे फुलंब्री तालुक्यात येते. तेथे जिल्हा परिषदेचे केंद्रीय विद्यालय आहे. उर्दू व मराठी माध्यमात शिकण्याची सोय केवळ आठवीपर्यंतच. पुढील शिक्षणाचा पेच विद्यार्थ्यांसमोर येतो. त्यातही विशेषत: मुलींच्या शिक्षणाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक पालक अल्पवयातच मुलींची लग्न उरकून टाकत आहेत. १५-१६ व्या वर्षी तेथील मुलगी आई झालेली दिसते आहे. मुलींवर अल्पवयातच मातृत्वाचे ओझे टाकण्यासारखी सामाजिक समस्या निर्माण होण्यामागे येथे आठवीनंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याचेही एक कारण आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

धामणगाव गाव अत्यंत आडमार्गावर आहे. येथे एसटीही शाळेच्या वेळेत येत नाही. खासगी वाहनांमधून पाठवून शिक्षणाचा भार पेलण्याची आर्थिक शक्तीही येथील पालकांची नाही. बहुतांश सर्व शेतकरी, शेतमजूर किंवा लहानसा व्यवसाय करणारे.

१८ जूनपासून उर्दू माध्यमाच्या शाळांना सुरुवात झाली. पुढील शिक्षणाची काही व्यवस्था झाली का, म्हणून सोमवारी शालेय समितीचे पदाधिकारी केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विचारणा करण्यासाठी आले होते. त्यात सरपंच पती कैलास सांडू भोसले, मुजीब लतीफ शेख, मुस्तफा दाऊद शेख अशा पाच ते सात जणांचा समावेश होता. उत्तर नाही मिळाल्यानंतर आठवीनंतर आमची मुलगी घरात बसेल, असे बऱ्याच पालकांनी मुख्याध्यापकांना सांगितले. एकटय़ा बुशराच्या वडिलांची ही समस्या नाही तर धामणगावसारख्या जिथे कुठे आठवीनंतर पुढील शिक्षणाची सोय नाही त्या ठिकाणी शेवटी पालकवर्ग एक-दोन वर्षे मुलीला घरात ठेवून घेतात व नंतर लग्न उरकून टाकतात. अल्पवयीन मुलींवर मातृत्वाचे ओझे येऊन पडते. काही दिवसांपूर्वीच अल्मास नावाच्या गावातील मुलीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचे एका पालकाने सांगितले.

मुलींचे अल्पवयात होणारे लग्न ही एक येथील सामाजिक समस्या बनली असून ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी झालेल्या कॉन्फरन्सवरील संवादात आपण ती त्यांच्यासमोर मांडल्याचे शिक्षिका शेख सादिया अल्ताफ यांनी सांगितले. केवळ उर्दू माध्यमांच्या शाळेतील पालकांची ही स्थिती नाही, तर मराठीमधील मुलींपुढेही पुढील शिक्षणाचा पेच निर्माण झाला आहे. धामणगावात मराठी माध्यमाची एक खासगी शाळा असली तरी त्यात काही जणच मुलीला प्रवेश देतात. पण काही पालक वर्ष-दोन वर्षांतच मुलींचे हात पिवळे करतात.

हुशार मुलींची अडचण

बुशराचे वडील कारभारी म्हणतात,‘बेटी पढाओ’ सांगितले जाते, पण कुठपर्यंत हे नाही सांगत कोणी. बुशरावर विषय निघाला, तर आठवीची मुलगी लहान थोडीच असते, असा त्यांचा प्रश्न. त्यांची मुलगी बुशरा हिची एक मैत्रीणही बुशराच आहे. तिची आठवी झाल्यानंतर वडिलांनी मे महिन्यात लग्न उरकून टाकले. कारभारी यांची बुशरा अभ्यासात हुशार. शिक्षिका सादिया यांनी तिच्या वडिलांना चार चौघांत समजावले, की मुलगी पुढे अधिकारीही होईल कदाचित. तिला शिकवा. पण ते मानायला तयार नाहीत.