मोहन अटाळकर

मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून पाहणी

हरिसालचे डिजिटलायझेशन फसल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केल्यानंतर पंधरा दिवसांनी गावच्या उपसरपंचानी त्यांचे दावे खोडून काढणारे ‘फेसबुक लाईव्ह’ दाखवले. पण त्यानंतरही गावात मते-मतांतरे कायम आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) पथकाने  नुकतीच गावाला भेट दिली. त्यातून ‘डॅमेज कंट्रोल’साठी सरकारची धावाधाव दिसून आली.

ई-लर्निगची साहित्य तपासणी

मुख्यमंत्री कार्यालयातील तज्ज्ञ अद्वैत सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ एप्रिलला हरिसालला भेट दिली. गावातील दुकानदारांशी चर्चा करून ई-लर्निगचे साहित्य तपासले. काही व्हिडिओ क्लीप देखील काढल्या. टेलिमेडिसिन विभागातील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर यंत्रणेत सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या. तेव्हापासून काही दृश्य बदल दिसू लागले आहेत.  बँकेच्या एटीएममधील पैसे लवकरच संपत होते. पण त्यात  सुधारणा झाली आहे, असे मिस्त्रीकाम करणारे बाजी बेठेकर यांनी सांगितले.

सुमारे एकवीसशे लोकवस्तीच्या गावात तीन वर्षांपूर्वी मोबाईल संपर्क यंत्रणा नव्हती. ती आता आली आहे, जवळपास साठ टक्के लोकांजवळ अ‍ॅन्ड्रॉईड फोन आहेत. बहुतांश लोकांचे बँकेत खाते आहे, त्यांच्याकडे एटीएम कार्ड आहे. लोक आता हळूहळू ऑनलाईन व्यवहार शिकत आहेत, असे येथीलच अशोक आठवले यांनी सांगितले.

सुधारणेला बराच वाव

देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून ओळख निर्माण झाल्यानंतर पर्यटनाला चालना मिळाली आहे. अनेक गावकऱ्यांनी ‘होम स्टे’ची सुविधा निर्माण केली आहे. त्याची नोंदणी ही ऑनलाईन होऊ शकते. हा एक डिजिटलायझेशनचा फायदा झाला आहे. जल्दीफाय या कंपनीने मोफत वायफाय सुविधा देणारे सात हॉटस्पॉट दिले आहेत. एकाचवेळी अनेकांनी वाय-फायचा वापर केल्याने अनेकवेळा इंटरनेटचा वेग मंदावतो. सुधारणेला अजून बराच वाव आहे, असे आठवले सांगतात.

टेलिमेडिसिन सेवेचा  तीन वर्षांमध्ये सुमारे ३४८ रुग्णांनी लाभ घेतला. या केंद्रातून रुग्णांच्या रक्ताचे नमुने धारणी  उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जातात. तेथून  ई-मेलवर अहवाल कळवले जातात. दुपारी १२ ते १ या वेळेत अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला जातो, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांना एकूण सहा टॅब देण्यात आले आहेत, त्यातील चार बिघडले आहेत. गावातील अंगणवाडीत टीव्ही आणि डोंगलच्या माध्यमातून मुलांना बालगीते दाखवली जातात. शाळेत संगणकीय शिक्षण दिले जाते, असे गावकऱ्यांनी सांगितले.

‘डिजिटल झाले म्हणजे काय झाले, ते सरकारने सांगावे’

या संपूर्ण प्रकरणातून गावाची आणखी बदनामी नको, असे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे गाव डिजिटल झाले म्हणजे काय झाले, याचा लेखाजोखा सरकारने मांडावा, असाही एक मतप्रवाह येथे आहे. अजूनही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. महसूल कामांसाठी धारणीलाच जावे लागते. भुरा कास्देकर यांची रक्कम दोन वेळा एटीएममध्ये वीज गेल्याने अडकून पडली होती. ती मिळवण्यासाठी तीन महिने वाट पहावी लागली. मुख्यमंत्री कार्यालयातील पथकाने सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश दिल्याने सुधारणा होतील, पण सरकारने मूलभूत सोयी-सुविधांकडेही लक्ष द्यावे, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.